‘सामना’तला लेख वाचून बोध घ्या, भ्रष्टाचार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांची सूचना

अलीकडेच वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक लाच घेताना ट्रॅप झाले होते. याची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेतली आहे. आज पार पडलेल्या गुन्हे परिषदेत आयुक्तांनी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड दम सहकाऱ्यांना भरला. तसेच ‘सामना’ दैनिकात प्रभाकर पवार यांनी भ्रष्टाचारावर लिहिलेला लेख सर्वांनी आवर्जून वाचा आणि त्यातून बोध घ्या, अशी सूचना त्यांनी केली.
मुंबई पोलिसांची गुन्हे परिषद आज पार पडली. यावेळी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी विविध बाबींवर वक्तव्य करत चांगले काम करण्याच्या सूचना केल्या. भारती यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक त्यांच्या केबिनमध्येच लाच घेताना ट्रॅप झाले होते. त्यानंतर अलीकडेच वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यातच वरिष्ठ निरीक्षक व उपनिरीक्षक ट्रॅप झाले. या घटनेनंतर ‘सामना’ दैनिकात ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी पोलिसांच्या डोळ्यात अंजन घालणारा भ्रष्टाचारावर लेख लिहिला होता. वास्तवाची मांडणी करत पैशांचा मोह करू नका, या मोहापायी कुटुंब उद्ध्वस्त होते, शिवाय पोलीस दलाची नाहक बदनामी होते, असे सांगत पवार यांनी लेखामध्ये ज्वलंत उदाहरणांसह मार्मिक भाष्य केले होते. हाच लेख आज आयुक्तांनी सर्व सहकऱ्यांना आवर्जून वाचण्यास सांगितला. इतकेच नव्हे तर तेथे स्क्रिनवर तो लेख झळकावला आणि यातून सर्वांनी बोध घ्या, असे सांगितले.
Comments are closed.