Police Commissioner interacts with citizens; Godaghat will soon be a no vehicle zone
मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० दिवसांच्या कृती आराखड्यातंर्गत पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रमांतर्गत पंचवटीतील रामकुंड परिसरात पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या विविध समस्यांवर पोलीस आयुक्त कर्णिक यांनी सकारात्मक उत्तर देत लवकरात लवकर ठोस उपाययोजना केल्या जातील असे सांगितले. (Police Commissioner interacts with citizens; Godaghat will soon be a no vehicle zone)
यावेळी उपस्थित नागरिकांनी परिसरातील वाहतूक कोंडी, अनाधिकृत रिक्षा थांबे, भाविकांची होणारी लुट, वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न आणि गोदाघाटावरील होणाऱ्या चोऱ्या व हाणामाऱ्या विषयीच्या समस्या मांडल्या. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक ज्योती आमणे, महेश महंकाळे, खंडू बोडके, विशाल गोवर्धने, गुलाब भोये, कृष्णकुमार नेरकर, राजेंद्र फड, जय मोटवाणी, चंद्रशेखर पंचाक्षरी, सुनील महंकाळे, दत्तू बोडके यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, गोपनीय कक्षाचे सहा. पोलीस उपनिरीक्षक शेखर फडताळे, पोलीस हवालदार राजेंद्र सोळसे, अभिजीत पैठणकर, राहुल लभडे आदींसह नागरिक उपस्थित होते.
गोदाघाट परिसरात ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदुषण रोखण्यासाठी बॅटरी रिक्षेचा पर्याय सुचवला आहे. तसेच पंचवटी परिसरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या असल्याने सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे त्यावर नियोजन केल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.
गुरूमितसिंग बग्गा,माजी नगरसेवक
शहरातील रिक्षा चालकांपैकी ३० टक्के रिक्षा चालकांकडे लायसन्स नाही. तसेच जर आरटीओ आणि पोलीस यांनी एकत्रित येऊन रिक्षांना बारकोड चिकटवले तर एका क्लिकवर रिक्षा मालक व चालक यांची माहिती उपलब्ध होण्यासाठी मदत होईल.
गिरीश मोहीते, सामाजिक कार्यकर्ते
गोदाघाट परिसर हा तीर्थक्षेत्र असल्याने हा सायलेन्स झोन क्षेत्रात येतो. मात्र याठिकाणी येणाऱ्या वाहनांमुळे दररोज कर्णकर्कश हॉर्न वाजवले जात असल्याने परिसरात नो हॉनकिंगचे फलक लावावे. महिला भाविकांसाठी याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात वस्त्रांतरगृह उभारावे.
देवांग जानी, गोदाप्रेमी
सीसीटीव्ही लावा, गुन्हेगार शोधण्यासाठी मदत होईल
नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या समस्यांची नोंद घेण्यात आली आहे. शहरातील काही उद्योजकांकडून सीएसआर फंडातून पोलीसांना शहर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच शहरात ५०० हून अधिक कॅमेरे बसवण्यात येणार आहे. सर्वाधिक नागरिकांकडून गोदाघाट परिसरात नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करण्याची मागणी केली जात असल्याने लवकरच यावर उपाययोजना करून आमलात आणले जाईल. तसेच गोदाघाटावर होणाऱ्या चोरीच्या घटना आणि गुन्हेगारी घटना आटोक्यात आणण्यासाठी व्यावसायिकांनी तसेच संस्थांनी पुढाकार घेत परिसरात एक सीसीटीव्ही रस्त्या कव्हर होईल अशा पद्धतीने लावावा जेणेकरून गुन्हेगार शोधण्यासाठी मदत होईल. नागरिकांनी पोलीस विभागासोबतच इतर विभागांच्या समस्या मांडल्या आहेत लवकरच इतर विभागांसोबत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती दिली. दरम्यान आगामी कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहे. त्यामुळे गोदावरी नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी देखील काम सुरू असून लवकर गोदावरी नदी प्रदूषण मुक्त होईल असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.
Comments are closed.