पोलीस डायरी – ठाण्यातील बकासुरांचे शतक पार !
>> प्रभाकर पवार
शंकर रावजी पाटोळे (वय वर्षे ४६. राहणार, दोस्ती इम्पेरिया, मानपाडा रोड, ठाणे, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका अतिक्रमण, नियंत्रण व निष्कासन विभाग) याला ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी बांधकाम व्यावसायिक अभिजित मधुकर कदम यांच्याकडून २५ लाख रुपयांची लाच घेताना त्याच्या ठाणे येथील कार्यालयातच रंगेहाथ पकडण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयात डाटा ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या ओमकार राम गायकर (वय २८ वर्षे) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी उपायुक्त शंकर पाटोळे याच्या वतीने २५ लाखांची लाच घेताना ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयाबाहेर पंचासमोर पकडले. लाचेच्या नोटांना व पैशांच्या कापडी पिशवीला अॅण्टी करप्शनच्या पथकाने अॅन्थ्रासिनची पावडर लावली होती. त्यावर ओमकारच्या हाताचे ठसे उमटले. ओमकार गायकरला रंगेहाथ पकडल्यानंतर लाचेची मागणी करणारा खरा सूत्रधार उपायुक्त शंकर पाटोळे यास ताब्यात घेण्यात आले. बांधकाम व्यावसायिक अभिजित कदम यांच्या विकासाच्या आड येणारी अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी त्यांच्याकडे शंकर पाटोळेने ५० लाखांची लाच मागितली होती. त्याचा १० लाखांचा पहिला हप्ता शंकर पाटोळेने सुशांत सुर्वे या इसमाच्या बँक खात्यात जमा करून घेतला तरीही शंकर पाटोळे याने कोणतीही कारवाई केली नाही. उलट लाचेची अधिक मागणी केली तेव्हा अभिजित कदम यांनी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे उपायुक्तांविरुद्ध तक्रार केली.
सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज रामचंद्र सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शंकर पाटोळेविरुद्ध ठोस पुरावे गोळा करून त्याला आपल्या सापळ्यात अडकविले, शंकर पाटोळे याने धोका नको म्हणून अनेकदा पैसे स्वीकारण्यासाठी जागा व वेळा बदलल्या. तक्रारदार व अॅण्टी करप्शनवाल्यांना १ ऑक्टोबरला उपायुक्ताने दिवसभर नाचविले, परंतु अॅण्टी करप्शन व तक्रारदार अभिजित कदम यांनी संयम सोडला नाही. सकाळी लावलेला ट्रॅप सायंकाळी ५.३० वा. यशस्वी झाला. पैशांची अतीव हाव, रोज गाडाभर अन्न व माणूस खाणाऱ्या बकासुरासारखी शंकर पाटोळेची भूक होती. त्याला भीमरूपी अॅण्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी तूर्त तरी लगाम घातला आहे. तूर्त याच्यासाठी म्हणता येईल की, शंकर पाटोळे हा पुन्हा खात्यात येऊन धुमाकूळ घालू शकतो. याचे उदाहरण वसई-विरार शहर महानगरपालिकेचा नगररचना विभागाचा उपसंचालक वाय. एस. रेड्डी याचे देता येईल.
नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारती स्कॅममध्ये वसई-विरार शहर महानगरपालिकेचा नगर विभागाच्या उपसंचालक वाय. एस. रेड्डी याचा सहभाग आढळल्यानंतर ‘ईडी’ने त्याच्या वसई व हैदराबाद येथील घरी १३ ऑगस्ट २०२५ रोजी छापा मारून ८ कोटी ६० लाखांची रोकड व सोने असे मिळून ३२ कोटी रुपये जप्त केले. मनी लॉण्डरिंग केसमध्ये त्याला अटक केली. याच अधिकाऱ्याला २०१६ साली २५ लाखांच्या लाचेसह अटक करण्यात आली होती. त्या वेळीही या अधिकाऱ्याच्या घरी १ कोटी रुपयांची रोकड सापडली होती. तेव्हा हा अधिकारी निलंबित झाला होता. अशा या भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा खात्यात घेऊन त्याला मोक्याची व क्रीम पोस्टिंग देण्यात आली. सिडकोमध्ये त्यासाठी विशेष पदही निर्माण करण्यात आले. त्यामुळे या अधिकाऱ्याचा गॉडफादर कोण असेल हे लोकांनीच ठरवावे.
नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारती प्रकरणात गुंतलेले वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार हे तर प्रतिचौरस फुटामागे बांधकाम व्यावसायिकांकडून २० ते २५ रुपये आकारायचे. त्यामुळेच वसई, विरार, नालासोपारा परिसरात अनधिकृत इमारतींचे पेव फुटले. पालघर जिल्ह्यातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधव हाही अलीकडे ५० हजारांची लाच घेताना पकडला गेला.
डोंबिवली महानगरपालिकेचा अतिरिक्त आयुक्त संजय गजानन घरत व त्याचे दोन वसुली कारकून बांधकाम व्यावसायिकाकडून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यालयातच लाच घेताना पकडले गेले. ठाण्यातील दबंग अधिकारी संजय घरत याने ४२ लाखांची लाच मागितली होती. ठाणे-पालघर जिल्ह्यातून रोज कोणी ना कोणी लाच घेताना पकडला जातो. गेल्या नऊ महिन्यांत (३० सप्टेंबर २०२५ पर्यंत) ठाणे जिल्ह्यातून १०० च्यावर लोकसेवकांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. त्यात राजपत्रित अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. गेली दोन-अडीच दशके ठाण्याच्या मोक्याच्या ठिकाणी भ्रष्ट अधिकाऱ्यांचीच नेमणूक होत आहे. त्यांच्यावर कुणाचाच अंकुश यापूर्वी नव्हता, आज आजही नाही. निवडणूक काळात ठाणे व नवी मुंबईतील काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईत पाठविण्यात आले होते, परंतु मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या कठोर कार्यपद्धतीला घाबरून काही अधिकाऱ्यांनी आपली मुंबईबाहेर बदली करून घेतली. बकासुरालाही लाजवील अशी मागणी असेल तर ती गोष्ट लपत नाही, त्यामुळेच त्यांना मुंबई सोडावी लागली. वसई-विरारचे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त संजय भगत, उपायुक्त शंकर पाटोळे, वाय. एस. रेड्डी, उपजिल्हाधिकारी संजय जाधव असे खादाड बकासुर जेलमध्ये जाऊ लागले आहेत. त्यात महसूल व पोलीस अधिकारी आघाडीवर आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकसेवक कोणतीही अमानवी कृती करीत आहेत. अशांना रोखण्याचे तंत्र कुणाकडेच नाही. सत्ताधारीच जर भ्रष्टाचाराने बरबटलेले असतील तर भ्रष्ट नोकरशहा कसे गप्प बसतील?
उपायुक्त शंकर पाटोळे याने ५० लाखांची लाच स्वीकारण्यासाठी ओमकार गायकर या सरकारी नोकराचा व सुशांत सुर्वे या खासगी व्यक्तीचा वापर केला. सुर्वेच्या बँक खात्यात दहा लाखांचा पहिला हप्ता कदम या बांधकाम व्यावसायिकाने ट्रान्सफर केला. अॅण्टी करप्शनने गायकर व सुर्वे या दोघांनाही अटक केली आहे. तेव्हा जनहो सावधान! कोणाचेही विशेषतः लोकसेवकांकडून पैसे स्वीकारण्यापूर्वी किंवा बँक खात्यात वळते करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा, नाहीतर तुमच्यावरही जेलमध्ये जायची वेळ येईल.
Comments are closed.