दसरा मेळाव्यासाठी अशी असेल वाहतूक व्यवस्था

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मेळाव्याच्या निमित्ताने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आले आहे.

पोलिसांच्या सूचना

शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी त्यांची वाहने सी. रामचंद्र चौक व वसंत देसाई चौक या ठिकाणी सोडून त्यानंतर शिवाजी पार्क येथील कामगार क्रीडा भवन (15 कार), वनिता समाज (15 कार), संयुक्त महाराष्ट्र दालन (15 कार), वीर सावरकर स्मारक (25 कार) येथे पार्किंग करण्यासाठी घेऊन जावीत.

पश्चिम व उत्तर उपनगरातून येणाऱ्या मोठ्या वाहनांतून (उदा. बसेस, टेम्पो इ.) कार्यकर्त्यांना माहीम, शोभा हॉटेल येथे डावे वळण देऊन सेनापती बापट मार्गावरून बाळ गोविंददास मार्ग जंक्शनपर्यंत नेऊन वाहने पार्क करून सभेसाठी जायचे. जीप अथवा कार एल.जे. रोडने राजा बडे चौकापर्यंत न्यावीत व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर सदर वाहने जे.के. सावंत मार्गावरील कोहिनूर वाहनतळ येथे पार्किंगकरिता पाठवावीत.

पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणारी मोठी वाहने (उदा. टेम्पो, बस इ.) दादर, खोदादाद सर्कल येथे उतरून फाइव्ह गार्डन, माटुंगा येथे पार्किंगकरिता पाठवावीत.

दक्षिण मुंबईतून येणारी वाहने (उदा. टेम्पो व बस इ.) ही डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गे स्वा. सावरकर मार्गावरून सूर्यवंशी क्षत्रिय सभागृह मार्गापर्यंत येतील व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर ती सयानी रोडने सेनापती बापट मार्गावर पार्किंग करतील.

वाहने उभी करण्याची व्यवस्था पुढीलप्रमाणे
(बसेस, टेम्पो ट्रव्हलर्स, मोठे टेम्पो)

  • संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर (क्षमता – 390 बसेस)
  • कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग, दादर (क्षमता – 390 बसेस)
  • आप्पासाहेब मराठे मार्ग (क्षमता – 50 बसेस)
  • माहीम कॉजवे ते माहीम जंक्शन
  • पाच उद्याने, मातुंगा
  • एडनवाला रोड, माटुंगा
  • नथलल पारेख, मातुंगा
  • आर.ए.के. रोड, वडाळा
  • चारचाकी हलकी वाहने
  • इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, दादर (क्षमता – 500 कार)
  • इंडिया बुल्स 1 सेंटर, ज्युपिटर मिल कंपाऊंड, एल्फिन्स्टन, सेनापती बापट मार्ग (क्षमता – 500 कार)
  • कोहिनूर पार्क, शिवाजी पार्क (क्षमता – 1030 कार)

जेवणाचे डबे, बॅगा आणू नका!

मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसेनाप्रेमी जनतेने व शिवसैनिकांनी जेवणाचे डबे, बॅगा किंवा इतर वस्तू घेऊन येऊ नये असे निर्देश पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव दिले आहेत. या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात प्रवेशद्वारातून प्रवेश करताना सुरक्षा तपासणी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

शेकडो पोलीस व एसआरपीएफची तुकडी

शिवतीर्थ परिसरात अपर पोलीस आयुक्तांच्या निरीक्षणाखाली तीन उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, 100 अधिकारी, 400 अंमलदार तैनात असतील. त्याशिवाय, घातपात विरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, क्युआरटी व एसआरपीएफ कंपनीही त्यांच्या दिमतीला असेल.

आसन व वाहन व्यवस्था पुढीलप्रमाणे असेल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाच्या नेत्यांचे आगमन वीर सावरकर मार्गावरून होईल. त्यामुळे या मार्गावर कोणीही वाहने घेऊन येऊ नये.

शिवसेना उपनेते, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख व अन्य निमंत्रितांना कालिकामाता मंदिराच्या शेजारून तसेच स्काऊट पॅव्हेलियनच्या बाजूने प्रवेश देण्यात येईल. आसन संख्या मर्यादित असल्याने निमंत्रण पत्रिकेशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

शिवसेना नेते व व्यासपीठावरील मान्यवरांसाठी वीर सावरकर मार्गावरील उद्यान गणेश मंदिरापुढील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारून प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक मीडियाचे कॅमेरामन व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना समर्थ व्यायाम मंदिराकडून प्रवेश देण्यात येईल. पत्रकारांनी ओळखपत्र दाखवून प्रवेश करावा व पोलिसांना सहकार्य करावे.

शिवतीर्थावर येणारे शिवसैनिक व अन्य मान्यवरांना शिवतीर्थ येथे येण्यास सोयीचे व्हावे यासाठी स्थानिक पोलीस व वाहतूक पोलिसांना वाहतुकीचे आणि गर्दीचे योग्य नियंत्रण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Comments are closed.