अखेर रेखाचित्रावरून आरोपी ओळखण्याचे पोलिसांचे आवाहन; अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला, 50 तास उलटले तरी आरोपी फरार!
संगमनेर वडगाव पान परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील ॲसिड हल्ल्याने तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा चा़गलाच हादरला असताना तब्बल ५० तास उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखेर हतबल झालेल्या पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध करत नागरिकांकडे मदतीचे आवाहन केले आहे.
मंगळवार १७ मार्चला शाळा सुटल्यानंतर शिकवणी आटोपून घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला महादेव मळा परिसरातील कच्च्या रस्त्यावर अज्ञात माथेफिरूने गाठले. पत्ता विचारण्याचा बहाणा करत थांबवून त्याने बाटलीतील ॲसिडसदृश द्रव थेट मुलीच्या चेहऱ्यावर फेकत थरारक हल्ला केला आणि घटनास्थळावरून पसार झाला. या अमानुष प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
जखमी मुलीवर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १२४ (१) व १२६ (२) अंतर्गत कारवाई सुरू आहे.
दरम्यान गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे सांगत पोलिसांनी गुन्हे शोध पथक, फॉरेन्सिक युनिट तसेच शहर व तालुका पोलिसांची स्वतंत्र पथके मैदानात उतरवली आहेत. मात्र एवढ्या मोठ्या यंत्रणेच्या हालचाली असूनही आरोपीचा मागमूस लागत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून ते प्रसारमाध्यमांसमोर सादर करण्यात आले आहे. पोलिसांचे नागरिकांना आवाहन रेखाचित्रातील व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा
९६८९९०३५८८ / ०२४२५-२२५४३३ / ९८२२३००२३३ / ९५२७९३०९९७
माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.