हरियाणात प्रहार कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला
गुरुग्राममध्ये तणावाची परिस्थिती : 20 हून अधिक जण जखमी, पोलिसांच्या कृतीविषयी नाराजी
वृत्तसंस्था/गुरुग्राम
हरियाणातील गुरुग्रामच्या मानेसरमध्ये कलम 163 लागू असूनही, गुरुवारी हजारो संपकरी कर्मचारी जमल्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याप्रसंगी चेंगराचेंगरी झाली. तसेच या आंदोलनात 20 हून अधिक कर्मचारी जखमी झाले. एकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. लाठीमारानंतर संतप्त संपकऱ्यांनी पोलिसांची दुचाकी पेटवली. तसेच एका वाहनावर दगडफेक करून त्याची दर्शनी काच फोडली. हा संघर्ष अनेक तास सुरू होता.
गुरुग्राममध्ये काही दिवसांपूर्वी होंडा कंपनीत पगारवाढीच्या मागणीसाठी संप झाला होता. त्यानंतर, तीन दिवसांत हा संप अर्धा डझनहून अधिक मोठ्या कंपन्यांमध्ये पसरला. तथापि, होंडा कंपनीसोबत करार झाल्यानंतर ते कामावर परतले. सत्यम, मुंजल शोवा, रिकोह आणि इतर कंपन्यांमधील कर्मचारी तीन दिवसांपासून कामावर परतण्यास तयार नाहीत. आंदोलनांवर बंदी घालण्यासाठी कलम 163 लागू करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, आंदोलकांनी पोलिसांचे आदेश डावलत आंदोलन सुरूच ठेवल्याने ते चिरडण्याचा प्रयत्न पोलीस आणि प्रशासनाकडून झाला.
कामगारांचे आंदोलन का?
कंत्राटी कामगार बऱ्याच काळापासून शोषणाचे बळी ठरले आहेत. किमान वेतन, ओव्हरटाईम वेतन, सुरक्षा आणि कायमस्वरूपी रोजगार यांसारख्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने आंदोलन सुरू असल्याचे कामगार संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांशी झटापट, त्यानंतर लाठीचार्ज
पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांशी समेट घडवण्याचा प्रयत्न असताना झटापट झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांना ढकलण्यात आले. तसेच त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपकरी कर्मचाऱ्यांनी आंदोलन हा आपला हक्कांसाठीचा लढा असल्याचे सांगत पोलिसांनी हस्तक्षेप करू नये किंवा व्यवस्थापनाची बाजू घेऊ नये, असे स्पष्ट केले. त्यावरूनच सुरुवातीला झटापट आणि नंतर लाठीमार झाल्याने वातावरण तंग झाले होते.
Comments are closed.