गुन्हे वृत्त – नशा करायला रेल्वे पटरीत जाताना पोलिसांनी उचलले, सोनसाखळी चोरणाऱ्यास 24 तासांत अटक

पाव आणण्यासाठी दुकानात गेलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळय़ातील सोनसाखळी हिसकावून आरोपी पळाला. गुन्हा करून कुर्ल्याबाहेर सटकण्यात तो यशस्वी ठरला. परंतु कुर्ला पोलिसांनी अचूक माग काढत त्याला 24 तासांच्या आत अटक केली. नशा करण्यासाठी माटुंगा रेल्वे पटरीत जात असताना पोलिसांनी त्याला उचलले.

संतोषी आसरानी (62) या वृद्धा कुर्ल्याच्या सुभाषनगरकडे जाणाऱ्या गल्लीतील एका दुकानात पाव आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मागून आलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळय़ातील  सोनसाखळी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी संतोषी यांनी तक्रार दिल्यानंतर कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल चव्हाण व पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी कोण ते समजले. मग सीसीटीव्हीच्या आधारे माग काढला असता आरोपी हा शाहूनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. अमान शेख (22) असे त्या आरोपीचे नाव असून त्याचा घरचा पत्ता कळताच पोलीस तेथे गेले, परंतु तो घरी मिळून आला नाही. त्यामुळे खबऱयांकडून माहिती काढली असता तो माटुंगा रेल्वे पटरीत नशा करण्यासाठी जात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन अमानला पकडले. त्याच्याकडून चोरीची सोनसाखळी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक

इनॉर्बिट मॉलकडे जात असलेल्या तरुणीचा विनयभंग करून पळून गेलेल्या एकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. कुलदीप कनोजिया असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोरेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत कुलदीपला गजाआड केले.

पीडित तरुणी ही बुधवारी रात्री इनॉर्बिट मॉल येथून पायी चालत जात होती. तेव्हा तिच्या मागून एक जण आला. काही कळण्यापूर्वी त्याने तिच्यासोबत नकोसे कृत्य केले. तरुणीचा विनयभंग करून तो पळून गेला. त्या घटनेने तरुणीला जबर धक्काच बसला. घडल्याप्रकरणी तिने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. गोरेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बागुल यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत खरात यांच्या पथकातील अधिकाऱ्याने तपास सुरू केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कुलदीपला ताब्यात घेऊन अटक केली. त्याने तरुणीचा विनयभंग केल्याचे उघड झाले.

हेरॉईन तस्करी; दोघांना अटक

हेरॉईनची तस्करी करणाऱ्या दोघांना वांद्रे अमली पदार्थविरोधी कक्षाने अटक केली. चाँद शेख आणि अब्दुला खान अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांकडून पोलिसांनी पावणे सोळा लाखांचे हेरॉईन जप्त केले. वांद्रे-माहीम खाडीलगत काही जण हेरॉईन तस्करीसाठी येणार असल्याची माहिती वांद्रे युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर पथकाने शनिवारी सायंकाळी तेथे सापळा रचला. शेख आणि खान हे दोघे तेथे आले. हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून पावणे सोळा लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केले. त्या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

मिक्सरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

सुसाट वेगात जाणाऱ्या सिमेंटच्या मिक्सरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. शुभांगी मगरे असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात गणेश माधव हा रॅपिडोचा मोटरसायकल चालक जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घडल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी मिक्सर चालक जवाहिर यादवला अटक केली आहे. शुभांगी या माटुंगा येथे कामाला होत्या. शनिवारी त्याने उबेरची रॅपिडो बाईक बुकिंग केली होती. त्या मोटरसायकलवरून मुलुंड येथून माटुंगा येथे जात होत्या.

Comments are closed.