अमृतसरमध्ये पोलीस अधिकाऱ्याची हत्या

सरकारकडून परिवाराला मदत जाहीर

अमृतसर: पंजाबच्या अमृतसरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा पंजाब पोलीस विभागाच्या एका अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरजीत सिंह हे रात्री 2.30 वाजता दुचाकीवरून गस्त घालत असताना काही अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारात हरजीत सिंह गंभीर जखमी झाले, त्यांना तत्काळ अमृतसरच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हरजीत सिंह यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या परिवारासाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी या हत्येप्रकरणी दु:ख व्यक्त केले. एका पोलिसावर गोळ्या झाडल्या जाण्याचा प्रकार पंजाबच्या कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. पंजाब एक सीमावर्ती राज्य आहे, केंद्र अन् राज्य सरकारने कायदा-सुवस्थेला सुदृढ करण्याची गरज असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. पोलिसांनी हरजीत सिंह यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पडताळून पाहिले जात आहे. सध्या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Comments are closed.