आमदार बांगर यांचे अश्रू वाया गेले!पोलीस अधीक्षक म्हणाले, आम्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार तपासत होतो,आमदार बांगर यांचे घर तपासलेच नाही

माझ्या घरी शंभर पोलिसांनी पहाटे धाड टाकून झाडाझडती घेतल्याचे भोकाड पसरून सांगणारे मिंधे गटाचे नाटकी आमदार संतोष बांगर यांचे अश्रू चक्क वाया गेले! पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आम्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार तपासत होतो, आमदार बांगर यांचे घर आम्ही तपासलेच नाही, असे स्पष्ट केले. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या खुलाशामुळे आमदार संतोष बांगर, ‘लावणी’फेम माजी खासदार हेमंत पाटील हे चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

हिंगोली जिल्ह्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी मिंध्यांचे आमदार संतोष बांगर यांनी आकाशपाताळ एक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश टाळण्यात यावा, अशी सक्त सूचना देऊनही आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत भाजपला सुरूंग लावला. एवढेच नाहीतर भाजपच्या काही उमेदवारांना माघार घ्यायला लावून मिंध्यांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यास भाग पाडले. आज होणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या सभेस लाडक्या बहिणींनी गर्दी करू नये म्हणून आमदार संतोष बांगर यांनी जंग जंग पछाडले. पोलिसांनी भल्या पहाटे आपल्या घरावर धाड टाकली, घराची झाडाझडती घेतली. कुणाच्या सांगण्यावरून पोलीस आपल्या घरात घुसले, असा सवाल करत त्यांनी थेट गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच शरसंधान केले.

आमदार संतोष बांगर यांची पाठराखण करण्यासाठी ‘लावणी’फेम माजी खासदार हेमंत पाटील सरसावले. आमदार बांगर यांच्या घरावर पहाटे पाच वाजता शंभर पोलिसांच्या पथकाने धाड घातली, घराची झाडाझडती घेतली. आमदार बांगर यांची वृद्ध आई आजारी असताना अशी झडती घेणे योग्य नसल्याचे हेमंत पाटील म्हणाले. मात्र पोलीस अधीक्षकांच्या खुलाशाने आमदार संतोष बांगर आणि हेमंत पाटील दोघेही तोंडघशी पडले आहेत.

आज या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी खुलासा करून आमदार संतोष बांगर यांच्या नाटकी अश्रूंचे बिंग चव्हाट्यावर आणले. रेकॉर्डवर असलेल्या सात गुन्हेगारांच्या तपासणीचे सर्च वॉरंट आमच्याकडे होते. त्यात कुठेही आमदार संतोष बांगर यांचे नाव नव्हते. आमदार बांगर यांच्या घरी पोलीस जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.

भाजपलाही ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ची भुरळ

शिवसेनेशी गद्दारी करून रातोरात संतोष बांगर ५० कोटी रूपये घेऊन मिंधे गटात पळाला होता. हा केवळ पैशांचा भुकेला आहे. संतोष बांगरला आजही गावखेड्यात ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ म्हणूनच ओळखतात, असा टोलाही भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी लगावला. आमदार बांगर कधीही आमचे महायुतीतील सहकारी नव्हते, ते हिस्ट्रीशिटर असल्याचेही आमदार मुटकुळे म्हणाले.

Comments are closed.