कॉंग्रेसविरूद्ध पोलिस नोंदणी खटला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातेची अवमानना करणारा एआयआधारित व्हिडीओ प्रसिद्ध केल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला आहे. काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या विरोधात नॉर्थ अॅव्हेन्यू पोलीस स्थानकात ही तक्रार सादर झाली आहे. गेले काही दिवस हा मुद्दा प्रचंड तापला असून त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जोरदार शब्दयुद्ध भडकले आहे. 10 सप्टेंबर या दिवशी बिहार काँग्रेस शाखेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची दिवंगत माता हीराबेन यांच्या सदृष एक एआय उत्पादित व्हिडीओ प्रसारित केला होता. यामुळे भारतीय जनता पक्षाने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसने नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून आता राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातेला ओढण्यापर्यंत या पक्षाची मजल गेली आहे. आता या पक्षाची गय करता कामा नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली होती. आता या पक्षाने काँग्रेस विरोधात प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्धार केला असून त्यानुसार तक्रार सादर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका सभेतही काँग्रेसच्या काही नेत्याने जाहीररित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातेच्या विरोधात अवमानास्पद उद्गार काढल्याचा आरोप आहे.
Comments are closed.