गेटवे ऑफ इंडियाजवळ भरसमुद्रात थरार, फेरीबोट बंद पडल्याने घबराट; पोलिसांनी तत्काळ मदतीचा हात देत केली सुखरूप सुटका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गेटवे ऑफ इंडियापासून १.५ नॉटिकल मैल खोल समुद्रात गुरुवारी सायंकाळी मोठी दुर्घटना टळली. समुद्रात अर्धा तास फिरून येणारी ‘अन्वरी’ ही फेरीबोट अचानक बंद पडली. त्यामुळे बोटीत असलेल्या ३८ जणांचा थरकाप उडाला. ही बाब समजताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून दुसऱ्या बोटीच्या साहाय्याने ‘अन्वरी’ बोटीला समुद्रकिनारी आणले. यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

गेटवे ऑफ इंडिया येथून समुद्रात अर्धा तास फिरून येणारी ‘अन्वरी’ फेरीबोट १.५ नॉटिकल मैल आत असताना व तेथून पुन्हा गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने येत असताना गुरुवारी संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बंद पडली. बोटीवर ३४ प्रवासी व ४ कर्मचाऱ्यांसह (क्रू मेंबर्स) एकूण ३८ नागरिक होते. बोट बंद पडल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळताच कुलाबा पोलिसांनी नागरिकांना सुखरूप बाहेर आणण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले.

पोलिसांनी बंद पडलेल्या ठिकाणाजवळ असलेल्या अन्य बोटींची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी ‘आझाद हिंद’ ही फेरीबोट त्या ठिकाणी जवळ असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी ‘आझाद हिंद’ बोटीचे मालक जुनेद मुल्ला यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यामार्फत बोटीवरील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून ती बोट बंद पडलेल्या ‘अन्वरी’ बोटीजवळ पाठवली.

Comments are closed.