स्फोटाने पोलीस ठाणे हादरले
9 जणांचा मृत्यू, 27 जखमी : काश्मीरमधील नौगाम येथे स्फोटकांचे नमुने घेताना दुर्घटना
मंडळ संस्था/श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक पोलिसांसह 27 जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटाशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलच्या तपासावेळी फॉरेन्सिकची टीम स्फोटकांचे नमुने घेत असताना स्फोट झाला. तरीही अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे.
स्फोट झालेल्या अमोनियम नायट्रेटचा साठा हा दहशतवादी डॉ. मुजम्मिल गनईच्या फरिदाबादमधील भाड्याच्या घरातून जप्त करण्यात आला होता. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात गनई याला आधीच अटक करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात जप्त केलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातून पोलीस नमुने काढत असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा मोठा स्फोट झाला. स्फोट झालेले अमोनियम नायट्रेट हे जप्त केलेल्या 360 किलोग्रॅम स्फोटक रसायनांचा भाग होता. दरम्यान, नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेला स्फोट हा दिल्लीत झालेल्या स्फोटापेक्षाही मोठा असल्याचे बोलले जात आहे. पोलीस स्थानकाच्या आवारात उभ्या असलेल्या डझनभराहून अधिक वाहने आगीत जळून खाक झाली. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज सात किलोमीटर अंतरावर राजबाग, जुने सचिवालय, चानपोरा, सनतनगर, रावलपोरा आणि पंथा चौकात ऐकू आला.
नेमकं काय घडलं?
जप्त केलेले अमोनियम नायट्रेट पोलीस स्टेशनच्या आवारात साठवले होते. या स्फोटकांची तपासणी फॉरेन्सिक टीमकडून सुरू असताना मोठा स्फोट झाला असावा असा संशय आहे. दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाशी जम्मू काश्मीरचा संबंध उघड झाल्यानंतर तेथे अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांची नौगाम पोलीस स्टेशनच्या आवारात चौकशी सुरू होती. यादरम्यान झालेल्या स्फोटात अनेक पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे. तपासणीसाठी परिसरात आणलेल्या अमोनियम नायट्रेटमुळेच हा स्फोट झाला. श्रीनगरच्या नौगाम परिसराजवळ घडलेली ही दुर्घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मृतांची संख्या 9, परिसरात कडक सुरक्षा
स्फोटातील मृतांचा आकडा 9 इतका असल्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. तसेच 20 हून अधिक पोलिसांसह 27 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जखमींवर 92 आर्मी बेस आणि एसकेआयएमएस सौरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटात विशेष तपास यंत्रणेचा एक कर्मचारी, दोन महसूल अधिकारी, तीन एफएलएस टीम कर्मचारी, गुन्हे शाखेचे दोन छायाचित्रकार आणि एका अन्य कर्मचाऱ्याला प्राण गमवावे लागले. या घटनेमागे घातपात असल्याची चर्चाही सुरू होती. मात्र, तपास यंत्रणांकडून त्याबाबत कोणतीही स्पष्टोक्ती देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेनंतर सर्व यंत्रणांना अधिक दक्ष करताना सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
राज्यपालांकडून जखमींची विचारपूस
काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी नौगाम पोलीस स्टेशन स्फोटात जखमी झालेल्यांची भेट घेतली. त्यांनी उजाला सिग्नस रुग्णालयाला भेट दिली. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच नौगाम पोलीस स्टेशन स्फोट प्रकरणाबाबत, जम्मू काश्मीर राष्ट्रीय काँग्रेस (जेकेएनसी) अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी भाष्य केले आहे. नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली. स्फोटाची दुर्घटना ही आमची चूक आहे. स्फोटकांविषयी चांगली समज असलेल्यांवर जबाबदारी सोपविण्याची आवश्यकता होती, असे ते म्हणाले.
Comments are closed.