पोलिसांच्या ठेकेदाराची दादागिरी मोडीत, दिवाळीपर्यंत रस्ते खोदाई थांबविली

महापालिकेने शहरातील मध्यवर्ती पेठांपुरती मर्यादित भागात दिलेल्या परवानगीकडे दुर्लक्ष करून शहरातील इतर भागांत मनमानी पद्धतीने रस्ते खोदाई करणाऱ्या पोलिसांच्या ठेकेदारावर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. महापालिकेने या ठेकेदाराला कडक शब्दांत समजपत्र दिले आहे. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी सर्व रस्ते खोदाईची कामे सणानंतरच करावीत, असे आदेश पालिकेने काढले आहेत.
पथ विभागाकडून खोदाईसाठी 1 ऑक्टोबर ते 31 एप्रिलपर्यंत खोदाईला परवानगी दिली जाते. परंतु महापालिकेने स्वतःच्या नियमांचे उल्लंघन करत पथ विभागाने ऑक्टोबरपूर्वी पावसाळ्यात पुणे पोलिसांना सीसीटीव्हीच्या केबलसाठी पेठांच्या परिसरात खोदाईला परवानगी दिली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने महापालिकेने ठराविक भागात रस्ते खोदाईची परवानगी दिलेली असताना, त्याकडे दुर्लक्ष करत मनमानी पद्धतीने दादागिरी करत संपूर्ण शहरात खोदाईला सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बाजू मांडली. ठेकेदाराला खोदाई करण्यासाठी महापालिकेने दिलेली परवानगी आणि ठेकेदाराने प्रत्यक्षात खोदलेले रस्ते, याचे पुरावेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत सादर केले. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित ठेकेदाराला सुनावत यापुढील काळात महापालिकेकडून तक्रार येऊ न देण्याची समज दिल्याचे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
दिवाळीपर्यंत रस्ते खोदाईची कामे बंद राहणार
दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी मध्यवर्ती पेठांच्या भागात येतात. तेथेच रस्ते खोदाई सुरू असल्याने त्याचा त्रास नागरिकांना आणि पादचाऱ्यांना होतो. त्यामुळे दिवाळीपर्यंत रस्ते खोदाईची कामे पूर्णपणे बंद ठेवावी, असे पत्र महापालिकेने ठेकेदाराला दिल्याचे पावसकर यांनी सांगितले.
दररोज मीटरभर खोदाई अपेक्षित असताना किलोमीटरभर रस्ते खोदण्यात आले. त्यामुळे ठेकेदाराला पत्र पाठविले. महापालिकेने फक्त पेठांच्या ठराविक भागातच परवानगी दिली असताना, ठेकेदाराने अनेक ठिकाणी नियमबाह्य खोदाई केली. दररोज मीटरभर खोदाई अपेक्षित असताना किलोमीटरभर रस्ते खोदण्यात आले. त्यामुळे ठेकेदाराला पत्र पाठविण्यात आले असून, पोलीस आयुक्तांनाही याची माहिती दिली आहे.
अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, महापालिका.
Comments are closed.