Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदांच्या (जि.प.) निवडणुका घेण्याऐवजी प्रथम महानगरपालिकांच्या (मनपा) निवडणुका घेण्याकडे राज्य निवडणूक आयोगाचा कल असल्याचे दिसून येत आहे. या हालचालींना वेग आला असून, १५ ते २० डिसेंबरदरम्यान महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

४ डिसेंबर रोजी २९ मनपा आयुक्तांची बैठक

या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने उद्या, ४ डिसेंबर रोजी, राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आयुक्तांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. सर्व महानगरपालिकांचे आयुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचना व हरकतींचा सविस्तर आढावा या बैठकीत घेतला जाईल. आयोगाकडून १० डिसेंबरपर्यंत आलेल्या हरकती व सूचनांचे निरसन करण्याच्या हालचाली सुरू असून, त्यानंतर लगेचच निवडणुकीच्या घोषणेची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे.

महापालिकांना प्राधान्य देण्याचे कारण

राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचे बदल होण्याची शक्यता आहे. या तुलनेत २९ पैकी फक्त चंद्रपूर आणि नागपूर या दोनच महानगरपालिकांमध्ये आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे.

यामुळे, जि.प.ऐवजी उर्वरित २७ महानगरपालिकांच्या निवडणुका घेणे आयोगाला अधिक सोयीचे आणि लवकर शक्य वाटत आहे.

परिणामी, दुसऱ्या टप्प्यात जि.प.ऐवजी महापालिका निवडणुकीच्या हालचालीला सुरुवात झाली आहे. आयोगाच्या उद्याच्या बैठकीनंतर या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.