CM Fadnavis And Raj Thackeray Meet : मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर
देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आज ताज लँड्स एंड येथे एका विशेष कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही प्रमुख नेत्यांना एकाच मंचावर पाहण्याची संधी अनेक दिवसांनी मिळत असल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
हा कार्यक्रम ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व माधव अगस्ती यांच्या कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. याच सोहळ्यात त्यांच्या ‘स्टिचिंग स्टारडम फॉर आयकॉन्स, ऑन अँड ऑफ स्क्रिन’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील होणार आहे. ताज लँड्स एंड येथे आयोजित या महत्त्वपूर्ण समारंभाला हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत.
मागील अनुपस्थितीमुळे वाढली उत्सुकता
यापूर्वीही मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र येण्याची शक्यता होती, मात्र त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे ही भेट होऊ शकली नव्हती.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र येणार होते. परंतु, देवेंद्र फडणवीस हे पुण्यात अन्य एका कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते.
त्या पार्श्वभूमीवर, आज ताज लँड्स एंड येथील कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची उपस्थिती निश्चित असल्याने, त्यांच्यात होणारे संवाद आणि या भेटीचे राजकीय पडसाद कसे असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments are closed.