महामार्ग पुन्हा सुरू झाल्यानंतर राजकारण गरम झाले
मान सरकारने बैठक बोलाविली : शेतकऱ्यांचा सहभागी होण्यास नकार
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमधील शंभू आणि खनौरी बॉर्डरवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना हटवून पोलिसांनी 13 महिन्यांनी अमृतसर-अंबाला-दिल्ली महामार्गावरील वाहतूक सुरू केली होती. परंतु या कारवाईमुळे पूर्ण पंजाबमधील शेतकऱ्यांच्या संतापात भर पडली आहे. पंजाब सरकारच्या विरोधात राज्यातील शेतकरी संघटना रस्त्यांवर उतरण्याची तयारी करत आहेत. तर काँग्रेसने आम आदमी पक्षाच्या सरकारला याप्रकरणी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
पंजाब पोलिसांनी शेतकरी नेते सरवण सिंह पंधेर समवेत 100 शेतकऱ्यांवर गुन्हे नोंदवत त्यांना पतियाळा तुरुंगात पाठविले आहे. राज्यभरात सुमारे एक हजाराहून अधिक शेतकरी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. मोगा, भटिंडा, मुक्तसर, फरीदकोट आणि होशियारपूरमध्ये सरकारच्या कारवाईमुळे नाराज शेतकरी संघटना आणि पोलिसांदरम्यान झटापट देखील दिसून आली. शेतकरी संघटनांनी 26 मार्च रोजी चंदीगड कूचची घोषणा केली आहे.
शंभू आणि खनौरी बॉर्डरवरील शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आल्यावर पंजाब सरकारने भारतीय किसान युनियन (उगराहां) आणि संयुक्त किसान मोर्चा (बिगर राजकीय)च्या नेत्यांना शुक्रवारी बैठकीसाठी बोलाविले हेत. परंतु भारतीय किसान युनियन एकताचे नेते जोगिंदर सिंह उगराहां यांनी चंदीगडमध्ये होणाऱ्या बैठकीत सामील होण्यास नकार दिला. राज्य सरकारने गुरुवारी ज्याप्रकारे कारवाई केली ते पाहता सरकारवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही असे म्हणत जोगिंदर यांनी संयुक्त किसान मोर्चालाही बैठकीत भाग न घेण्याचे आवाहन केले आहे.
शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांना जालंधर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रांतीगृहात वैद्यकीय पथकाच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना जालंधरच्या पीआयएमएस रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले होते.
Comments are closed.