योगी-भागवत भेटींमुळे राजकारण तापले आहे
उत्तर प्रदेशात आत्तापासूनच 2027 निवडणुकीची सज्जता, भाजपकडून चाचपणी, प्रचारासाठी यंत्रणा
वृत्तसंस्था/लखनौ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात झालेल्या भेटीमुळे त्या राज्यातील राजकारण तापले आहे. उत्तर प्रदेशात 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी आत्तापासूनच सज्ज होण्यास प्रारंभ केला असून आपली प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे. मोहन भागवत यांनी आदित्यनाथ यांच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्याशीही चर्चा केली आहे. त्यामुळे या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनल्या आहेत.
मोहन भागवत एका कार्यक्रमासाठी लखनौ येथे गुरुवारी आलेले आहेत. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी त्यांची भेट घेतली. दोघांनीही बंद दरवाजाआड चर्चा केली. या चर्चेची माहिती अधिकृतरित्या उघड करण्यात आलेली नाही. मात्र, ही चर्चा आणखी सव्वा वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातच होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. भागवत यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशीही चर्चा केल्याने या भेटी राजकारणासाठीच होत्या, अशी राजकीय निरीक्षकांची भावना झाली आहे.
आदित्यनाथ-मौर्य वादाचीही चर्चा
मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यात वाद निर्माण झाला आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हा वाद विधानसभा निवडणुकीपूर्वी मिटविणे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात फटका बसला होता. त्यामुळे पक्षाच्या जागा कमी झाल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या वेळी निर्माण झालेली त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून पक्षांतर्गत मतभेद संपवून कार्यकर्त्यांचे उत्साहवर्धन करण्याचे काम केले जात आहे.
धर्मासमवेत जातींचेही भान
सध्या अनेक राज्यांमध्ये हिंदू मतदार जागृत झाला आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण होत आहे, याचा अनुभव अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये येत आहे. तथापि, धर्मासमवेत जातींनाही महत्व आहे, हे ओळखून भारतीय जनता पक्ष स्वत:ला निवडणुकीसाठी सज्ज करीत आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी गुरुवारी आपल्या निवासस्थानी ‘बटुक ब्राम्हणां’ना आमंत्रित केले होते. वेदांचे पठण करणाऱ्या बालविद्यार्थ्यांना ‘बटुक’ अशी संज्ञा आहे. उत्तर प्रदेशात ब्राम्हण मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हा समाज भाजपचा समर्थक मानला जातो. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे मत आहे.
विभाजित केल्यास, विभागले जाईल
हिंदू समाजात राजकीय फूट पडल्यास या समाजाचीही हानी होईल, हे लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला आहे. तो लोकप्रिय होत आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि बिहार येथील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांना मिळालेल्या मोठ्या यशात या घोषणेचेही योगदान निश्चितच आहे. आता भारतीय जनता पक्षासाठी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. कारण, 2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची ती सर्वात मोठी निवडणूक असेल. त्यामुळे त्या निवडणुकीत यश मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आत्तापासूनच सज्जता करण्यास प्रारंभ केला असल्याचे या घडामोडींवरुन दिसून येत आहे. हिंदू मतदारांच्या ध्रुवीकरणाची व्याप्ती वाढविताना जातींचेही भान राखण्याचा आणि विविध जातींसमूहांमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न पक्ष करीत आहेत. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळवले असल्याने ही तिसरी निवडणूक त्या पक्षासाठी अत्यंत निर्णायक सिद्ध होणार आहे.
Comments are closed.