Worli Dome | Thackeray बंधू एकत्र, ‘मराठी विजय मेळावा’ ऐतिहासिक!

वरळीच्या डोम येथील स्टेडियममध्ये ‘मराठी विजय मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू या मेळाव्यासाठी सकाळी साडेअकरा वाजता येणार आहेत. या मेळाव्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे, कारण दोन ठाकरे एकत्र येत आहेत. ज्या ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी नातेवाईक किंवा राजकीय ज्येष्ठ व्यक्ती कामी आल्या नाहीत, त्यांना ‘पहिलीपासूनची तिसरी भाषा’ हा विषय एकत्र आणण्यास कारणीभूत ठरला. दोन्ही ठाकरे हे राजकीय एकत्रीकरण नसल्याचे सांगत असले तरी, मेळाव्याचे स्वरूप आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता, हे दोन्ही ठाकरेंचे एक होण्याचे संकेत मानले जात आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, “ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठी माणसांची हिंदी सक्तीच्या विरोधात एकजूट झाली, सरकारला नमतं घ्यावं लागलं, त्यानं निर्णय मागे घ्यावा लागला. मला असं वाटतं तो विजय आहे, तो विजय साजरा करण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आहोत.” १९६० नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतरची ही सर्वात मोठी मराठी माणसाची एकजूट असल्याचेही त्यांनी नमूद केले. संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टवरील ‘बाराखडी’चा उल्लेख करत, महाराष्ट्रात राहायचे असेल तर ‘बाराखडी’ शिकावीच लागेल, असा संदेशही त्यांनी दिला. या मेळाव्याला सुप्रिया ताई उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. वरळी डोमची क्षमता सात ते आठ हजार लोकांची असून, बाहेरही एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments are closed.