संवेदनशील मुद्द्यांवरील राजकारण अस्वीकार्य

आसामच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा : राज्यात काही अनोळखी लोक दाखल

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाममध्ये देशाच्या विविध भागांमधून काही अनोळखी लोक येत आहेत, या लोकांनी स्वत:च्या मर्यादा ओलांडल्या तर त्यांना अटक केली जाईल असे वक्तव्य मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी मंगळवारी केले आहे. आम्ही कुठलेही कट्टरवादी कृत्य किंवा संवेदनशील मुद्द्यांवर राजकारण सहन करणार नाही. मुंबई आणि केरळमधून आलेले लोक कट्टरवादी असून ते काही खास समुहांच्या कारवायांना बळ पुरवितात आणि त्यांचा बचाव करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

हे लोक मुंबई आणि केरळमधून आलेले वकील असून आम्ही त्यांच्यावर नजर ठेवली आहे. राज्यात एनआरसी प्रक्रिया सुरू असताना हे लोक आले होते आणि त्यांनी पूर्ण प्रक्रियेत अडथळे निर्माण केले होते. त्यावेळी सरकारने त्यांच्या हालचालींवर अधिक लक्ष दिले नव्हते. परंतु आता आम्ही प्रत्येकावर नजर ठेवून आहोत. या लोकांनी नियमांचा भंग केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.

एनआरसी प्रक्रियेदरम्यान काही लोकांनी जाणूनबुजून बनावट दस्तऐवज तयार केले होते. समान नावांचा लाभ उचलत अशा लोकांची नावे यादीत सामील करण्यात आली, जे त्याकरता पात्र नव्हते. बनावट नातेवाईक जोडण्याचे काम काही लोकांच्या कटातून झाले, ज्यात कथित सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांचे नाव सामील असल्याचा दावा मुख्यमंत्री शर्मा यांनी केला आहे.

मागील 5 वर्षांमध्ये अनेक अनियमितता समोर आल्या असून सरकार आता त्या सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यास तयार आहे. अलिकडेच उरियमघाट येथे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान बीबीसीची टीम तेथे आली होती, परंतु त्यांना जंगलक्षेत्रात प्रवेशाची अनुमती देण्यात आली नाही. जंगलक्षेत्रात प्रवेशासाठी प्रथम अनुमती घ्यावी लागेल असे आम्ही पूर्वीच स्पष्ट केले होते. यावेळी आम्ही साहसी पावले उचलत असून कुणालाही या मुद्द्यांचा लाभ उचलू देणार नसल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.

Comments are closed.