Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत

Sanjay Raut: छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये राहिले, पण भुजबळांच्या सर्व प्रकरणात ईडीपासून ओडब्ल्यूपर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला. याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे. सर्वात भ्रष्ट पक्ष जर देशात कोणताही असेल, तर तो भारतीय जनता पक्ष आहे. जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे, तोपर्यंत सगळे मनानं, तनानं, धनानं भाजप बरोबरच राहणार. ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल, त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग ते आमच्याबरोबर असतील, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला.

सिंचन घोटाळा आणि भाजपच्या धमक्या
भाजपने सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडण्याच्या दिलेल्या इशाऱ्यावर राऊत म्हणाले, “तुम्ही त्यांना एकदा क्लीन चीट दिली आहे ना. स्वतः प्रधानमंत्र्यांनी गर्जना करून पण ते सरकारमध्ये आले, आता कोणत्या तोंडाने तुम्ही त्यांची फाईल ओपन करणार आहात? त्या फाईलमध्ये काय आहे की नुसत्या डरकाळ्या फोडताय पोकळ?”

महायुतीमधील कुरघोडी आणि महापौर निवडणूक
महापौर निवडणूक पुढे ढकलल्याबद्दल ते म्हणाले, शिंदे रुसून बसलेले आहेत आणि रुसून बसलेल्या सुनबाई ज्या आहेत त्या सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतात आणि दिल्लीचे सासरे ऐकायला तयार नाहीत, त्यामुळे त्या नववधूची फार अडचण झालेली आहे.

इथं गुलामांचा बाजार भरला आहे
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचं राजकारण शिसारी आणणारं झालं आहे. इथं गुलामांचा बाजार भरला आहे. माणसाच्या मताला, विचाराला आणि जगण्याला काही किंमतच ठेवली नाही. सर्व काही पैशानं, तोही भ्रष्ट पैशानं तोललं जातं. भारतीय जनता पक्षाचे जे मांडलिक राजे आहेत एकनाथ शिंदेंसारखे, ते सुद्धा स्वतःला या राज्याचे बादशाह समजून या गुलामीच्या बाजारामध्ये बोली लावत आहेत.

Comments are closed.