Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?

Sanjay Raut: बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुती (Mahayuti) प्रयत्न करत असली, तरी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतर्फे उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. काँग्रेसने संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेयांना फोन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर आली आहे. आता उद्धव ठाकरे सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय.

संजय राऊत म्हणाले की, काल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली. राहुरीसंदर्भात आज शरद पवारांच्या पक्षाची बैठक आहे. जयंत पाटील यांच्याशी माझी देखील चर्चा झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी देखील आमचा संवाद सुरू आहे. यात शिवसेनेची भूमिका थोडी कमी आहे. कारण बारामतीची जागा आम्ही लढलेलो नाही. ती जागा शरद पवारांच्या पक्षाची आहे. राहुरीची जागा देखील शरद पवारांच्या पक्षाची आहे. त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा आहे.

Sanjay Raut: राहुरीत आमच्याकडे तीन उमेदवार, पण…
राहुरीत आमच्या पक्षाकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत. राजकारणात निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात. जरी आमच्याकडे इच्छुक असले तरी देखील महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल. प्राजक्त तनपुरे हे तेथील माजी आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागची निवडणूक लढवलेली आहे. ते यावेळी निवडणूक लढणार आहेत की नाही, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज निर्णय होईल अशी माझी माहिती आहे. त्यानंतर आम्ही त्यावर निर्णय घेऊ. काँग्रेस पक्ष त्यानंतर राहील. पहिली संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. कारण त्यांच्या वाटेला आलेली ही जागा आहे. काँग्रेस पक्षाचं त्या मतदारसंघात प्राबल्य आहे. आमच्याकडे तीन उमेदवार आहेत पण ही निवडणूक होणार आहे, असे त्यांनी म्हटले.

Comments are closed.