इलेक्ट्रिक वाहनांनाही प्रदूषण दंड

आपल्या देशात कित्येकदा विचित्र घटना घडतात, असा प्रत्येकाचा अनुभव आहे. राजस्थानात अशीच एक अनोखी घटना घडली असून ती समजल्यावर प्रत्येकाचीच स्थिती हसावे की रडावे, अशी होत आहे. या राज्यातील नागौर या शहरात वाहतूक पोलिसांनी चक्क एका इलेक्ट्रिक वाहनाला प्रदूषण पसरविण्यासाठी दंड केला असून कारचालकाला दंडाचे चलनही देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक कारमुळे खरेतर कोणतेही प्रदूषण होत नसते. कारण या कारमधून धूर येतच नाही. तरीही हा प्रकार घडल्याने आता त्याची चर्चा होत आहे. या घटनेचे व्हिडीओ चित्रण आता प्रसारित होत आहे. ते पाहून लोक आचंबित होताना दिसत आहेत.

या कारवर ‘पीयुसी’ प्रमाणपत्र चिकटविण्यात आले नव्हते. इंजिन ‘पीयुसी निल’ दाखवत होते. म्हणून दंड करण्यात आला आहे, असे वाहतूक अधिकाऱ्याने स्पष्ट केल्यानंतर कारचा चालक चाट पडला. कारण वीजेवर चालणाऱ्या कारमध्ये ना इंजिन असते, ना सायलेन्सर. या कारमधून धूर येतच नसल्याने प्रदूषणाचा संबंध नसतोच. वीजेच्या कार्सवर पीयुसी प्रमाणापत्र चिकटविण्याची कोणतीही आवश्यकता कायद्याच्या अनुसार नसते. हे प्रमाणपत्र पेट्रोल आणि डीझेल वाहनांसाठी आवश्यक आहे. तथापि, कित्येकदा वाहतूक अधिकाऱ्यांना या संबंधातील माहितीच नसते. त्यामुळे ते वीजेवर चालणाऱ्या वाहनांनाही काहीवेळा नियमावर बोट ठेवून दंड करतात. त्यामुळे कारचालकाला मन:स्तापाला तोंड द्यावे लागते. खरेतर पेट्रोल किंवा डीझेलवर चालणाऱ्या कार्स टाळून कोणी पर्यावरणस्नेही व्यक्तीने वीजेवर चालणारे वाहन घेतल्यास त्याचे कौतुक व्हावयास हवे. पण अनेकदा उलटेच होते.

असे प्रकार भारतात अनेकदा होतात. ते टाळावयाचे असतील, तर वाहतूक अधिकाऱ्यांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे  वाहतूक अधिकांऱ्यांना कित्येकदा वीजवर चालणाऱ्या वाहनांना कोणते नियम असतात आणि कोणत्या नियमांमधनून त्याना सूट असते, हे माहीत नसते. परिणामी, असे गमतीचे प्रकार घडतात. सोशल मिडियावरही या घटनेसंबंधी अनेक मीम्स प्रसारित होत आहेत. बहुतेक सर्व दर्शकांनी ही वाहतूक विभागाची चूक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Comments are closed.