पोप लिओ यांना फुफ्फुसाचा कर्करोग आहे.
उजव्या फुफ्फुसाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे काढला
वृत्तसंस्था/ रोम
कॅथोलिक चर्चचे प्रमुख आणि ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धार्मिक नेते पोप लिओ चौदावे यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर रोमच्या जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी रात्री 90 मिनिटांच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या उजव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागातून कर्करोगाची गाठ काढण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. नियमित आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचा एक सामान्य प्रकार असलेल्या ‘लंग अॅडेनोकार्सिनोमा’चे निदान झाल्याचे व्हॅटिकन सिटीने प्रसिद्ध केलेल्या वैद्यकीय अहवालात स्पष्ट केले आहे.
रोममधील ऑगस्टिनो जेमेली रुग्णालयात पोप लिओ यांच्यावर मंगळवारी रात्री 90 मिनिटांची शस्त्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया यशस्वी झाली आणि कोणतीही गुंतागुंत झाली नाही. पोप यांना शुद्ध आली असून रुग्णालयात त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी बुलेटीनद्वारे स्पष्ट केले आहे.
20 ऑक्टोबरपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द
शस्त्रक्रियेनंतर पोप यांचे सर्व सार्वजनिक आणि धार्मिक कार्यक्रम 20 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या त्यांच्या लॅटिन अमेरिका दौऱ्याबद्दलही अनिश्चितता निर्माण झाली आहे. सध्या पोप सुमारे एक आठवडा पूर्णपणे विश्रांती घेणार आहेत. त्यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, कर्करोग त्यांच्या शरीराच्या इतर भागांमध्ये पसरला आहे का, याची डॉक्टर आता तपासणी करत आहेत.
Comments are closed.