पोर्तुगालने दुसऱ्यांदा यूईएफए नेशन्स लीग जिंकली

यूईएफए नेशन्स लीगच्या अंतिम सामन्यात पोर्तुगालने किताबी लढतीत स्पेनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 गोल फरकाने पराभव करत दुसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला. हा चुरशीचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. अखेर पोर्तुगालने पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डोने महत्त्वाचा बरोबरी साधणारा गोल नोंदवला. 21 व्या मिनिटाला स्पेनकडून मार्टिन जुबिमेंडीने पहिला गोल करत आघाडी मिळवून दिली. मात्र केवळ पाच मिनिटांनी पोर्तुगालच्या नूनो मेंडेसने आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल करत बरोबरी साधली. मध्यंतराच्या काही क्षण आधी 45 व्या मिनिटाला मिकेल ओयार्जाबालने पेड्रीच्या पासवर गोल करत स्पेनला पुन्हा 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 61 व्या मिनिटाला रोनाल्डोने मेंडेसच्या क्रॉसवर अप्रतिम व्हॉली घेत पोर्तुगालला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. हा रोनाल्डोच्या कारकीर्दीतील 938 वा गोल ठरला.
Comments are closed.