भारत-यूएस दरम्यान सकारात्मक चर्चा

अमेरिकेचे प्रतिनिधी लिंडन लिंच यांच्यासोबत चर्चा : लवकरच पुन्हा होणार बैठक : व्यापार कराराविषयी संकेत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताशी व्यापार विषयक चर्चा करण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेच्या व्यापारी शिष्टमंडळासमवेत भारताची मंगळवारी 7 तासांपर्यंत बैठक झाली आहे. या चर्चेचे फलित काय, यासंबंधी मौन पाळण्यात आले असले, तरी दोन्ही बाजूंकडून व्यापार करारासंबंधी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अमेरिकेच्या वतीने मुख्य वाटाघाटीकार ब्रेंडन लिंच तर भारताच्या वतीने अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी भाग घेतला.

व्यापार करारावरून अमेरिकेच्या पथकासोबत भारतीय अधिकाऱ्यांनी दीर्घ चर्चा केली आहे. ही बैठक एकदिवसीय होती, आता अमेरिकेचे पथक मायदेशी परतणार आहे. परंतु लवकरच पुढील बैठक होणार आहे. मंगळवारी 7 तासांपर्यंत झालेल्या बैठकीत व्यापार कराराच्या विविध पैलूंवर सकारात्मक आणि दूरदर्शी चर्चा झाली आहे. या बैठकीत व्यापार कराराला लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नांना वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमेरिकेचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांनी भारताचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांच्याशी द्विपीय व्यापार कराराप्रकरणी सकारात्मक चर्चा केली असल्याचे अमेरिकेच्या दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. तर भारताच्या  वतीने देखील बैठकीला सकारात्मक ठरविण्यात आले आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापाराच्या स्थायी महत्त्वाला स्वीकारात चर्चा सकारात्मक राहिल्याचे भारत सरकारने म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती दिली होती.

रशियन कच्चे तेल खरेदीप्रकरणी भारतावर 25 टक्के आयातशुल्क आणि 25 टक्के अतिरिक्त शुल्क लादण्यात आल्यावर कुठल्याही उच्चपदस्य अमेरिकन प्रतिनिधीचा हा पहिला भारत दौरा आहे. लिंच आणि भारतीय अधिकाऱ्यांदरम्यान बैठकीला सहाव्या फेरीच्या चर्चेच्या स्वरुपात नव्हे तर त्यापूर्वीच्या चर्चेच्या स्वरुपात पाहिले जावे. भारत आणि अमेरिका साप्ताहिक आधारावर व्हर्च्युअल माध्यमातून चर्चा करत आहेत, असे वाणिज्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

भारताची भूमिका

भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार तणाव कमी करण्यावरून बैठकीत चर्चा झाली. भारताने सातत्याने आयातशुल्काचा मुद्दा उपस्थित केला आहे. याचबरोबर भारताने स्वत:च्या लघूउद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यावरही भूमिका मांडली आहे. तसेच कृषी अन् डेअरी उद्योगाबाबतीत स्वत:च्या संरक्षणात्मक धोरणाबद्दल स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.

या बैठकीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील चर्चेच्या पुढच्या फेरीचा प्रारंभ झाला, असे म्हणता येणार नाही. तथापि, दोन्ही देशांमध्ये पुन्हा संवादाचा प्रारंभ होणे आवश्यक होते. तो या बैठकीनंतर झाला आहे. दोन्ही देशांना एकमेकांशी एक व्यापक व्यापारी करार हवा आहे. मधल्या काळात दोन्ही देशांमधील चर्चा थांबली होती. तिला आता पुन्हा प्रारंभ करण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण केले जात आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून अमेरिकेचे शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर आले आहे, अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

बैठक अधिकृत नाही

मंगळवारी झालेली बैठक ही भारत आणि अमेरिकेतील अधिकृत बैठक समजली जाऊ नये. हा वातावरणनिर्मितीचा प्रयत्न आहे. दोन्ही देशांमध्ये एक व्यापक व्यापार करार अशा प्रकारे करता येईल, यासंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. व्यापार करारातील अडचणी आणि अडथळे कसे दूर करता येतील, यावर विचारविमर्श करण्यात आला. दोन्ही देश पुन्हा एकमेकांच्या जवळ येण्याची आवश्यकता आहे. संबंधांमधील तणाव दूर होणे, ही बाब महत्वाची आहे. एकदा का हे ध्येय साध्य झाले की नंतर व्यापार करार प्रत्यक्षात होण्याची आशा धरता येणार आहे. त्यादृष्टीने ही बैठक अत्यंत महत्वाची असल्याचे स्पष्ट केले गेले.

काही दिवसांपासून सकारात्मक

भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एकमेकांसंबंधी प्रशंसोद्गार काढले आहेत. भारतासमवेत व्यापार चर्चा होत आहे. भारताची व्यापार करार होणे, ही अवघड किंवा जटील बाब नाही, असा संदेश अध्यक्ष ट्रंप यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या माध्यमातून दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या संदेशाला सकारात्मक उत्तर दिले होते. अध्यक्ष ट्रंप यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

भारताचा भर ‘भारत प्रथम’

भारत आणि अमेरिका यांच्यात पुन्हा चर्चा होत आहे. या चर्चेत भारताकडून ‘भारत प्रथम’ या तत्वावर भर देण्यात येत आहे. भारत आत्मविश्वासपूर्वक या चर्चेत सहभागी होत आहे. अमेरिकेशी व्यापार करार निश्चित होईल, अशी आमची भावना आहे. आम्ही आमचे शेतकरी आणि आमचे छोटे उद्योजक यांच्या हिताचा विचार हा या चर्चेचा आत्मा आहे. अमेरिका आमचा धोरणात्मक भागीदार असणारा देश आहे. आम्हाला अमेरिकेशी संबंध अधिक दृढ करायचे आहेत. हे शक्य होईल, आणि दोन्ही देशांना लाभदायक ठरेल, असा करार अमेरिकेशी होऊ शकेल, असे भारताला निश्चितपणे वाटते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या नव्या चर्चेची प्रथम फेरी संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले.

 

 

Comments are closed.