PPF की SIP १५ वर्षांनंतर सर्वाधिक परतावा कुठे मिळेल? असे आहे गणीत…
दर महिन्याला काही रक्कम वाचवून काहीजण आवर्ती ठेव म्हणजेच रिकरिंग खात्यात ठेवतात. काहीजण ती मुदत ठेव म्हणून ठेवतात. तर काहीजण आता म्युचुअल फंडद्वारे एसआयपीचा पर्याय स्वीकारत आहेत. मात्र,१५ वर्षांनंतर सर्वाधीक परतावा कशातून मिळेल, असा प्रश्न निर्माण होतो.त्यामुळे याबाबतचे गणीत समजून घेऊ.
पीपीएफसारख्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करावी की शेअर बाजारात, याबद्दल अनेकजण संभ्रमात असतात. कशातून सर्वाधिक नफा मिळेल आणि कुठे गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित आहे, हे एका सोप्या गणीतातून जाणून घेऊ.
पीपीएफ आणि एसआयपीसाठी गणना दिली आहे. दोन्ही १५ वर्षांसाठी चांगले पर्याय मानले जातात. तथापि, पीपीएफमध्ये सरकारी हमी असते, तर एसआयपीमध्ये जोखमीसह शेअर बाजाराच्या वाढीचे फायदे मिळतात. या कारणांमुळे १५ वर्षांनंतर दोन्ही पर्यायांमधील परतावा भिन्न असू शकतो.
पीपीएफ ही एक सरकारी बचत योजना आहे. याचा व्याजदर निश्चित असून, सध्या तो ७.१% आहे. यात गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात आणि मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम करमुक्त असते. याउलट, एसआयपीमध्ये (SIP) पैसे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवले जातात, ज्यात कोणताही निश्चित परतावा मिळत नाही. जर बाजारात तेजी असेल, तर मिळकत जास्त असू शकते. मात्र, जर बाजारात घसरण झाली, तर परतावा कमी असू शकतो.
जर दरवर्षी पीपीएफमध्ये ₹१.५ लाख गुंतवले, तर तुम्हाला ७.१% वार्षिक व्याज मिळेल. त्यामुळे मुदतपूर्तीनंतर एकूण ₹४०,६८,२०९ मिळतील, ज्यात ₹१८,१८,२०९ व्याजाचा समावेश असेल, तर एकूण गुंतवलेली रक्कम ₹२२,५०,००० असेल.
जर एसआयपी (SIP) द्वारे वार्षिक ₹१.५ लाख किंवा दरमहा ₹१२,५०० गुंतवले आणि अंदाजे १२% परतावा मिळवला, तर १५ वर्षांनंतर एकूण रक्कम ₹५९,४९,१४२ होईल, ज्यापैकी ₹३६,९९,१४२ व्याजातून मिळतात. अशा प्रकारे, एसआयपी (SIP) द्वारे ₹२० लाखांचा जास्त नफा मिळवता, परंतु तुम्हाला म्युच्युअल फंडावर कर भरावा लागू शकतो. हे तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंडाच्या प्रकारावर अवलंबून असते. याउलट, पीपीएफ (PPF) करमुक्त परतावा देतो. त्यामुळे शेअर बाजारातील जोखीम स्वीकारायची तयारी असेल तर एशआय़पी चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, कोणतीही जोखीम स्वीकारायची नसेल आणि सुरक्षित परतावा हवा असेल तर पीपीएफ हा चांगला पर्याय ठरतो.
Comments are closed.