पंजाब काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष, 35 नेत्यांना पत्र.
केंद्रीय नेतृत्वाकडे मागितली भेटीसाठी वेळ
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत चढाओढीदरम्यान पक्षाच्या सुमारे 35 नेत्यांनी हायकमांडला पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. हे सर्व नेते माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या गटाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात पक्षाची वर्तमान स्थिती अणि तळागाळातील वस्तुस्थितीची जाणीव पक्षनेतृत्वाला करून देऊ इच्छितो असे या नेत्यांचे सांगणे आहे.
पंजाबमधील नेत्यांचे हे पत्र सार्वजनिक करण्यात आलेले नाही. परंतु या पत्रावर काँग्रेसचे अनेक माजी आमदार आणि माजी मंत्र्यांची स्वाक्षरी असल्याचा दावा काँग्रेसचे माजी आमदार कुशलदीप सिंह ‘किक्की’ ढिल्लों यांनी केला आहे. तर या पत्रावर चन्नी यांची मात्र स्वाक्षरी नसल्याचे ढिल्लों यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि पंजाब काँग्रेस प्रभारी भूपेश बघेल यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. हे पत्र कुणाच्या बाजूने नाही तसेच कुणाच्या विरोधात नाही. केवळ संवादासाठी वेळ मागण्यात आली असल्याचे या नेत्यांचे सांगणे आहे.
चन्नींच्या व्हिडिओमुळे कलह उघड
या पूर्ण घटनाक्रमादरम्यान चन्नी यांचा एक व्हिडिओ समोर आल्यावर काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. व्हिडिओत चन्नी यांनी काँग्रेसमध्ये दलितांना योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. पंजाबमध्ये दलित लोकसंख्या 35-38 टक्क्यांदरम्यान आहे. तरीही सर्वोच्च पदांवर त्यांचे प्रतिनिधित्व दिसून येत नाही असे चन्नी यांनी म्हटले आहे. माझी टिप्पणी कुठलीही जात किंवा समुदायाच्या विरोधात नव्हती, मला दुष्प्रचाराचा शिकार करण्यात आल्याचा दावा चन्नी यांनी वाद उभा ठाकल्यावर केला आहे. याचदरम्यान भाजप नेते कुलजीत सिंह ढिल्लों यांनी चन्नी यांना भाजपमध्ये प्रवेशाची ऑफर देत राजकीय तापमान वाढविले आहे.
पंजाबमध्ये 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशास्थितीत काँग्रेसमधील या घडामोडी संघटनात्मक मजबुती आणि निवडणूक रणनीति दोन्हींच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
Comments are closed.