दिल्लीत कारमध्ये भीषण स्फोट

10 ठार, 40 जखमी : लाल किल्ल्याजवळ घडलेल्या घटनेनंतर अलर्ट जारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरुवातीच्या तपासात हा साधा स्फोट नसल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळीच दिल्लीला लागून असलेल्या फरिदाबादमध्ये 2,900 किलो अमोनियम नायट्रेट आढळून आल्याने त्याच्याशीही या घटनेचे धागेदोरे जोडले जात आहेत. तथापि, सुरुवातीलाच दोन्ही घटनांचा संबंध जोडणे योग्य नसल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळी ख•ा पडलेला नाही. त्यामुळे दहशतवादी बॉम्बस्फोटाची शक्यता नाकारली जात असली तरी पूर्णपणे फेटाळण्यातही आलेली नाही.

स्फोटात जखमी झालेल्या लोकांना ‘एलएनजेपी’ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढू शकतो. स्फोटाची तीव्रता जास्त होती. स्फोट इतका शक्तिशाली होता की 5-6 वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या स्फोटात जवळील स्ट्रीट लाईट्सही जळाल्या. आजुबाजुची दुकानांच्या खिडक्या आणि काचाही फुटल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाला सायंकाळी 6:55 वाजता स्फोटाची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या गाड्याही तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले.

दिल्लीसह अन्य शहरांमध्ये हाय अलर्ट

स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती मोठ्या कटाचा इशारा देते. दरम्यान, जवळील चांदणी चौक बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. लाल किल्ल्याभोवतीचा संपूर्ण परिसर आणि रस्ते बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, दिल्लीप्रमाणेच हरियाणा आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्येही अतिदक्षतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच मुंबई, हैदराबाद, कोलकाता, बेंगळूर, चेन्नई या महत्त्वाच्या शहरांमध्येही सुरक्षा वाढवून अलर्ट जारी करण्यात आला.

स्फोटाबाबत अनेक तर्क-वितर्क

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 वर स्फोट झाला. स्फोटानंतर एका कारला आग लागल्यानंतर त्याची झळ आजबाजुच्या सात ते आठ इतर वाहनेही त्याच्या कवेत सापडल्यामुळे जळून खाक झाली. तसेच जवळच्या अन्य वाहनांच्या काचाही फुटल्या. स्फोटावेळी मोठी गर्दी असल्यामुळे त्यात अनेकजण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट कारमधील सीएनजीमुळे झाला की इतर काही कारणाने झाला हे अद्याप कळलेले नाही.

पंतप्रधानांची गृहमंत्र्यांशी चर्चा

दिल्लीतील स्फोटाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी तपास अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली इत्यंभूत माहिती पंतप्रधानांना दिली आहे. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्व बाजूंनी तपास करण्याचे आणि जनतेच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेण्याचे निर्देश गृहमंत्र्यांना दिले.

अमित शाह घटनास्थळी

स्फोट झालेली ‘ह्युडाई आय20’ कार हरियाणातील होती आणि तिच्यावर एक लोगो लावलेला होता, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासातून मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. घटनेचे वृत्त कळताच ते घटनास्थळी गेले असून त्यांनी स्वत: परिस्थितीची पाहणी केली आहे. स्फोट झालेल्या कारमध्ये 3 लोक होते आणि कारच्या मागच्या भागात स्फोट झाला, असे प्रतिपादन दिल्ली पोलिसांनी केले आहे. हा दहशतवादी हल्लाच आहे, हे अद्याप निश्चितपणे घोषित करण्यात आलेले नाही. मात्र, सर्व शक्यता गृहित धरुन तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर गृहमंत्री अमित शाह एलएनजेपी रुग्णालयात जखमींना पाहण्यासाठी पोहोचले होते.

दहशतवादी हल्ल्याचा संशय, एक संशयित ताब्यात

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला. प्राथमिक तपासानंतर दिल्ली पोलिसांनी हा साधा अपघात नव्हता तर नियोजित स्फोट असल्याचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी कारमध्ये असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्याला गंभीर अवस्थेत ‘एलएनजेपी’ रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची कसून चौकशी करण्याची तयारी अधिकाऱ्यांकडून सुरू झाली आहे. स्फोट घडला त्यावेळी कारमध्ये तिघेजण असल्याचा संशयही क्यक्त केला जात असला तरी त्यांच्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली नाही.

घटनास्थळावरून संशयास्पद वस्तू जप्त

फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळावरून स्फोटक साहित्य, वायरिंग आणि बॅटरीचे तुकडे जप्त केले आहेत. या साहित्यामुळे सदर स्फोट मुद्दामहून घडवण्यात आल्याचा संशय बळावला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोटानंतर लगेचच कारला आग लागली आणि जवळपासच्या वाहनांनाही वेढली गेली. स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. एनआयए आणि स्पेशल सेलच्या पथकांनी तपास सुरू केला आहे. श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकेही घटनास्थळी पोहोचली असल्याची माहिती पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिली. सिग्नलवर एका संथ गतीने चालणाऱ्या वाहनाचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात जवळपास उभ्या असलेल्या अनेक वाहनांचेही नुकसान झाल्याचेही ते पुढे म्हणाले.

बेंगळूरसह राज्यात खबरदारीच्या सूचना

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कार स्फोटानंतर बेंगळूरसह राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांमध्ये खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी सोमवारी रात्री हा आदेश दिला. राज्यातील विमानतळे, रेल्वेस्थानके, बसस्थानके, बाजारपेठांसह गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंग यांनी बेंगळूर शहरात गस्त वाढविण्याची सूचना डीसीपी, एसीपींना दिली आहे.

अमित शाह घटनास्थळी

स्फोट झालेली ‘ह्युडाई आय20’ कार हरियाणातील होती आणि तिच्यावर एक लोगो लावलेला होता, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासातून मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. घटनेचे वृत्त कळताच ते घटनास्थळी गेले असून त्यांनी स्वत: परिस्थितीची पाहणी केली आहे. स्फोट झालेल्या कारमध्ये 3 लोक होते आणि कारच्या मागच्या भागात स्फोट झाला, असे प्रतिपादन दिल्ली पोलिसांनी केले आहे. हा दहशतवादी हल्लाच आहे, हे अद्याप निश्चितपणे घोषित करण्यात आलेले नाही. मात्र, सर्व शक्यता गृहित धरुन तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर गृहमंत्री अमित शाह एलएनजेपी रुग्णालयात जखमींना पाहण्यासाठी पोहोचले होते.

Comments are closed.