मोठी बातमी! कोलंबो कसोटीत ICC ची आणखी एका खेळाडूवर कारवाई, खात्यात जोडला एक डिमेरिट पॉईंट

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आणखी एका खेळाडूवर कारवाई केली आहे. आधीच आयसीसीने सोमवारी (24 ऑगस्ट) भारताचा यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा असिथा फर्नांडो यांना दंड ठोठावला होता. आता मंगळवारी (25 ऑगस्ट) आणखी एका खेळाडूला दंड ठोठावला आहे.
यावेळी आयसीसीने श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या याला शिक्षा केली आहे. त्याने आयसीसीच्या आचारसंहितेतील कलम 2.2 चे उल्लंघन केले. यामुळे त्याला ताकीद देण्यात आली असून, त्याच्या खात्यात एक ‘डिमेरिट पॉईंट’ जमा करण्यात आला आहे. त्याचा हा 24 महिन्यांच्या कालावधीतील हा पहिलाच गुन्हा होता.
दुसऱ्या दिवसाच्या खेळात बाद झाल्यानंतर बॅटने ‘बाउंड्री वेजेस’वर (मैदानाच्या सीमेवर असलेल्या जाहिरातींच्या फलकांवर) प्रहार केल्यामुळे श्रीलंकेच्या या फिरकी गोलंदाजावर ही कारवाई करण्यात आली. जयसूर्याने त्याचा गुन्हा मान्य केला असून आयसीसी एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफरीजचे अँडी पायक्रॉफ्ट यांनी सुचवलेली शिक्षा स्वीकारली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही
सामन्यावेळी मैदानातील पंच अहसान रझा आणि शरफुद्दुला इब्ने शाहिद, तिसरे पंच रॉड टकर आणि चौथे पंच प्रगीथ रामबुकवेल्ला यांनी जयसूर्याबाबत तक्रार केली होती.
जयसूर्या या सामन्यात आयसीसीच्या शिक्षेला सामोरे जाणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी झालेल्या वादानंतर आयसीसीने जैस्वाल आणि फर्नांडोला शिक्षा सुनावली होती. दोघांना त्यांच्या मॅच फीच्या 25% दंड आणि प्रत्येकी एक ‘डिमेरिट पॉइंट’ ठोठावण्यात आला.
या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असून श्रीलंकेने पहिल्या डावात 7 विकेट्स गमावत 230 धावा केल्या आहेत. तसेच भारताने पहिला डाव 503 धावसंख्येवर घोषित केला आहे. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारत 1-0 असा आघाडीवर आहे. (Prabath Jayasuriya has received an official reprimand for an incident on the second day of the second Test against India.)
Comments are closed.