पोलीस डायरी – कोर्ट म्हणते, ‘ते’ जिवंत ठेवण्याच्या लायकीचे नाहीत!

>> प्रभाकर पवार

मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर दत्तात्रय रामदास गाडे (वय वर्षे 35, रा. गुणाट, शिरुर, पुणे) या सराईत गुन्हेगाराने महाराष्ट्र शासनाच्या ‘शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची तक्रार स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर साऱ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली सारे पोलीस कामाला लागले तीन दिवसांनंतर दत्तात्रय गाडे हा आपल्याच गावच्या उसाच्या मळ्यात सापडला गावकऱ्यांच्या मदतीने पुणे पोलिसांनी दत्ता गाडेला ताब्यात घेतले व गाडेची माहिती देणाऱ्या गावकऱ्यांना एक लाखाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले.

शिरूरचा दत्ता गाडे नियमितपणे पुण्यात जायचा. रात्री शिवाजीनगर, शिरूर, स्वारगेट एसटी स्टॅण्डवर महिलांना हेरायचा व पैशांचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार करायचा. ज्या महिला विरोध करायच्या त्यांना चाकूचा धाक दाखवून आगारातील बंद एसटी बसमध्ये तो आपला कार्यभाग उरकायचा. मंगळवारी ज्या तरुणीवर दत्ता गाडेने बलात्कार केला तिने पोलिसांत तक्रार केल्यामुळे स्त्रीलंपट दत्ता गाडेचा अवतार संपला.

अशा घटना आपल्या देशात आज मिनिटागणिक घडत आहेत, परंतु बलात्कार करणाऱ्या नराधमांच्या दहशतीमुळे कुणी महिला-मुली तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. निर्जन, निर्मनुष्य ठिकाणी दत्ता गाडेसारखी श्वापदे शिकार शोधत असतात. परंतु गेला तर हत्ती जातो नाहीतर शेपूटही जात नाही मुंबईतील 2013 मधील शक्ती मिलमधील सामूहिक बलात्काराचा क्रूर प्रकार आठवला तर आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो.

22 ऑगस्ट 2013 रोजीचा तो गुरुवार होता एका इंग्रजी मासिकात इंटर्नशिप करणारी एक 22 वर्षीय छायाचित्रकार तरुणी आपल्या एका सहकाऱ्यासह खंडहर झालेल्या वरळी महालक्ष्मी येथील शक्ती मिलच्या कंपाऊंडमध्ये फोटोशूट करण्यासाठी गेली होती. सायंकाळची 6.30 ची वेळ होती. तेथे अगोदरच दबा धरून बसलेल्या गर्दुल्यांच्या चोरांच्या एका टोळीने प्रथम त्या मुलीच्या सहकाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून ताब्यात घेतले. त्याला बेदम मारले. त्यानंतर एका पहुंचाने त्याला झाडाला बांधले. तो ओरडू लागल्यावर त्याच्या तोंडात बोळा घालून त्याला गप्प केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने त्या तरुणीची बोबडीच वळली. अत्यंत ओसाड ठिकाणी ओरडून काहीच उपयोग झाला नाही. 13 जणांच्या एका टोळीने त्या तरुणीवर आळीपाळीने दगडधोंडे असलेल्या कोरड्या जमिनीवर अत्याचार केला. तिची पाठ रक्ताने ओलीचिंब झाली तरीही त्या राक्षसांना दया आली नाही. तरुणी रक्तबंबाळ झाली नसती तर कदाचित त्या तरुणीने घाबरून पोलिसांत तक्रार केलीही नसती, परंतु जीव वाचविण्यासाठी ती मुलगी रुग्णालयात दाखल झाली आणि शक्ती मिलमधील ओसाड जागेत झालेल्या या अमानुष गैंगरेपवर प्रकाश पडला. पोलिसांनी एक डझन आरोपीना अटक केली त्यापैकी तीन आरोपींना फाशीची व अन्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली त्या वेळी निकाल देताना सत्र न्यायालयाच्या तत्कालीन न्यायाधीश शालिनी फणसाळकर म्हणाल्या, “आरोपींनी जे कृत्य केले आहे त्याला क्षमा नाही. नव्हे, आरोपी जिवंत ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. जगण्याचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे. अशा आरोपींना फाशी देणेच योग्य होईल असेही न्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रात स्पष्ट केले होते, परंतु कालांतराने फाशी दिलेल्या आरोपीना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेले आरोपी शक्ती मिलच्या निर्मनुष्य असलेल्या आवारात नेहमी जायचे. तेथे प्रेमी युगुलं जायची. अशा युगुलांना हे नराधम धमकवायचे विरोध करणाऱ्या तरुणांना बेदम मारहाण करून त्यांच्यासोबत असलेल्या मुलीवर बलात्कार करायचे. कचरा वेचणाऱ्या महिलांनाही या नराधमांनी सोडले नव्हते. खासगी कंपनीत ऑपरेटर असलेली एक तरुणी आपल्या प्रियकराचा जीव वाचविण्यासाठी या नराधमांच्या स्वाधीन झाली, परंतु त्यानंतर तिचे मानसिक संतुलन ढासळले ती तरुणी मुंबई सोडून महाराष्ट्राबाहेर गेली. तिच्यावर झालेल्या अत्याचारानंतर महिनाभराने शक्ती मिलमध्ये छायाचित्रकार तरुणीवर झालेला अमानुष प्रकार वर्तमानपत्रात वाचून तिला धक्का बसला. ती मुंबईत पुन्हा आली. मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना भेटली. पोलिसांनी तिच्यासमोर आरोपी उभे केले असता ती तरुणी म्हणाली, “हो, हेच ते नराधम आहेत. यांना ताबडतोब फासावर चढवा!”

पोलीस डायरी – हिंदुस्थानी संस्कृतीवर घाला घालणाऱ्या अश्लील टोळ्या

शक्ती मिल असो, स्वारगेट असो, निर्जन ठिकाणी दत्ता गाडेसारखे खीलंपट गस्त घालत असतात. महिलांना हेरतात आणि त्यांच्यावर शखाचा धाक दाखवून अत्याचार करतात, परंतु 90 टक्के प्रकरणात कोणतीही महिला पुढे येऊन पोलिसांत तक्रार करीत नाही. पोलिसांत गेल्यावर आपल्या अब्रूचे अधिक धिंडवडे निघतील म्हणून बहुसंख्य महिला गप्प बसतात. त्यामुळेच बलात्काराच्या, अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. मध्यंतरी अंबरनाथ-टिटवाळा मार्गावरील नालिंबी या जंगलात गणेश रघुनाथ हा तरुण आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत असताना संजय सिद्धार्थ नरवडे हा रिक्षाचालक तेथे गेला. त्याने त्या मुलीची मागणी गणेशकडे केली त्याला गणेशने विरोध करताच या रिक्षाचालकाने गणेशला आपल्याकडील रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून जागीच ठार मारले व त्या मुलीवर गणेश विव्हळत असताना अमानुष बलात्कार केला.

पोलीस डायरी- दरोडेखोर ते बॉम्बस्फोट आरोपी, दाऊदचा अंत आता कराचीत !

महिलांनी घराबाहेरच पडू नये, लंपट पुरुषांच्या दृष्टीस पडू नये, अशीच भविष्यात परिस्थिती निर्माण होणार आहे. दरवर्षी आपल्या देशात 30 हजारांच्या वर बलात्काराचे गुन्हे दाखल होतात. त्यात 90 टक्के आरोपी हे परिचित असतात. हे जरी खरे असले तरी बलात्काराची आपल्या देशात 10 टक्केही नोंद होत नाही. तेव्हा महिलांनो सावधान, तुमच्या आजूबाजूला असलेल्या वखवखलेल्या नजरांपासून सावधान। अगदी नातेवाईकांपासूनही अंतर ठेवा. स्त्रीलंपट नराधमांनी बाप भाऊ, बहीण या नात्यांना कधीच तिलांजली दिली आहे. आपल्या देशात सर्वात जास्त अश्लील चित्रफिती (पॉर्न फिल्म) पाहिल्या जातात. त्यामुळेच दत्ता गाडेसारखे विकृत मनोवृत्तीचे लोक प्रवासी महिलांवरही अगदी खुलेआमपणे एसटी बसमध्ये बलात्कार करीत आहेत. दिल्लीत निर्भया’वरही प्रवासी बसमध्ये असाच प्रकार घडला. कोलकात्याच्या डॉ. तरुणीलाही हाल हाल करून ठार मारण्यात आले. तेव्हा हे रोखणे आता कुणाच्याच हाती राहिलेले नाही. गुन्हा सिद्ध झाल्यावर अशा गुन्हेगारांना भर चौकात चाबकाचे फटके मारणे, फाशी देणे हाच एकमेव मार्ग आता शिल्लक आहे. असे आरोपी जिवंत ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, असे कोर्ट म्हणते ते खरे आहे.

[email protected]

Comments are closed.