‘वेदनेचा सफरनामा’; ‘गुरुदत्त यांच्या प्रतिभेचा कलात्मक आविष्कार’
देशातील एक अग्रगण्य फिल्म सोसायटी असलेल्या प्रभात चित्र मंडळ यांचे योगदान मोठे आहे. जागतिक तसेच भारतीय दिग्दर्शकांच्या दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन व त्यांवरील चर्चासत्रे या प्रमुख कार्याच्या बरोबरीनेच चित्रपट अभ्यास वर्ग, चित्रपट रसास्वाद कार्यशाळा यांचे आयोजन करणे, चित्रपटसृष्टीतील कलावंतांचा कार्यगौरव, चित्रपटांवरील परिसंवाद, आदिवासी भागात चित्रपट मेळा यांसारखे उपक्रम प्रभात चित्र मंडळाने राबवले आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील संवेदनशीलता, काव्यात्मकता आणि वेदनांचा विलक्षण संगम घडवणारे ख्यातनाम दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रभात चित्र मंडळातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता ‘वेदनेचा सफरनामा’ हा दृश्राव्य कार्यक्रम सादर होणार असून त्यात गुरुदत्त यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाचा वेध घेतला जाणार आहे.
प्रसिद्ध अभ्यासक डॉ. संतोष पुलकर्णी यांच्या सादरीकरणातून ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ यांसारख्या अजरामर चित्रपटांच्या माध्यमातून गुरुदत्त यांच्या कलात्मक प्रवासाची आणि त्यांच्या अंतर्मुख वेदनेची ओळख करून दिली जाणार आहे.
हा कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला असून अधिकाधिक रसिकांनी मराठी ग्रंथ संग्रहालय, पहिला मजला, प्रभात गोल्ड सिनेमासमोर, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम) इथे या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रभात चित्र मंडळाचे सचिव डॉ. संतोष पाठारे यांनी केले आहे.
Comments are closed.