Prague Chess Festival – अरविंदचा जगज्जेत्या गुकेशला पराभवाचा धक्का
प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवातील मास्टर्स गटाच्या सहाव्या फेरीत हिंदुस्थानच्या अरविंद चिदंबरमने विद्यमान जगज्जेत्या डी. गुकेशचा पराभव केला. या पराभवामुळे गुकेश थेट स्पर्धेत अखेरच्या स्थानावर घसरला आहे.
या विजयामुळे अरविंद चिदंबरमने लाइव्ह रेटिंग यादीतही गुकेशला मागे टाकले आहे. गुकेशची आता 20 व्या स्थानावर घसरण झालीय. डिसेंबर 2024 मध्ये जगज्जेतेपद पटकावल्यानंतर गुकेशला आपला दर्जा कायम राखताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सामन्यात अरविंदने काळय़ा मोहऱयांसह खेळताना सुरुवातीला फिलिडोर डिफेन्सचा अवलंब केला, पण तो प्रभावी ठरला नाही. त्यानंतर सिसिलियन डिफेन्स स्वीकारत त्याने मधल्या डावात गुकेशवर दबाव वाढवला. 40 व्या चालीतील गुकेशच्या चुकीचा अचूक फायदा घेत अरविंदने 48 चालींत विजय मिळवला.
इतर सामने अनिर्णित राहिले. स्पर्धेत जॉर्डन व्हॅन फोरेस्ट 4.5 गुणांसह आघाडीवर असून, डेविड नवारा आणि नोदिरबेक अब्दुसत्तोरोव संयुक्त दुसऱया स्थानावर आहेत. चॅलेंजर्स गटात महिला विश्वचषक विजेती दिव्या देशमुख हिने थॉमस बिर्डसेनविरुद्ध बरोबरी साधली, तर सूर्यशेखर गांगुलीनेही डॅनियल युफ्फासोबत गुण वाटून घेतले.
Comments are closed.