Mermitteth – biratnouncement एल्डर प्रोटेक्शन वराटोग

>> प्रांजल वाघ
वाईच्या आग्नेय दिशेला असणारी बावधनची डोंगररांग. या डोंगररांगेच्या शेवटी उभा आहे एक प्राचीन दुर्ग – वैराटगड. शिवकाळात प्रामुख्याने लष्करी ठाणे म्हणून उपयोग होत असलेला हा किल्ला पावसाळ्यातील फिरस्तीसाठी खासच आहे.
महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणजेच वाई हे एक अत्यंत प्राचीन शहर! वाईचे दुसरे नाव विराटनगरी – थेट महाभारतातील विराट राजाशी नातं सांगणारं! याचं वाईच्या आग्नेय दिशेला बावधन लागते. बावधनच्या डोंगररांगेच्या शेवटी उभा आहे एक प्राचीन दुर्ग – ज्याची निर्मिती दुसऱया भोज शिलाहार राजाने इ.स. 12 व्या शतकात केली असे म्हणतात. त्याचं नाव वैराटगड.
असे म्हणतात, वैराटगड हे नाव विराट राजा अथवा विराटनगरीवरून आले असावे. बावधनच्या आग्नेयास मालुसारेवाडी आणि तिथूनच पुढे व्याजवाडी हे गाव लागते. इथून साधारण 1-1.5 तास चढाई केल्यावर आपण गडाच्या महाद्वाराकडे पोहोचतो. महाद्वाराच्या कातळकोरीव पायऱयांच्या इथे थोडा थांबा घ्यावा! इथेच उजवीकडे एक वाट जाते. त्या वाटेवर पाऊल टाकताच डोंगराच्या पोटात 5-10 फूट खोल गेलेलं, अर्धवट खोदलेलं एक छोटं भुयार आपल्या नजरेस पडतं. त्याच्याच बाजूला एका पत्र्याच्या आडोशाखाली काही शेंदूर फासलेले दगड आहेत. ही आहे लक्ष्मीदेवीची घुमटी. पायऱयांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यावर डोंगराच्या पोटात खोदलेली 4-5 पाण्याची टाकी आहेत. याने गडाचे प्राचीनत्व सिद्ध होते.
नागमोडी वळणं घेत कातळात खोदलेल्या पायऱया आपल्याला पडक्या महाद्वारातून गडात घेऊन जातात. इथे दरवाजाची चौकट, पहारेकऱयाच्या देवडय़ांचे अवशेष नजरेस पडतात. आत जाताच एक मारुती मंदिर आपले स्वागत करते.
साधारण 30 फुटी कातळकडा लाभलेल्या गडाला सलग, पुरुषभर उंच, चुन्याशिवाय बांधलेली भक्कम तटबंदी लाभली आहे. वाडय़ांचे, घरांचे अवशेष गडावर अनेक ठिकाणी दिसतात. पाण्याची 5 मोठी तळी गडावर आहेत. गडाच्या पूर्व टोकाकडे गडदेवता `वैराटेश्वर’ महादेवाचे मंदिर, तसेच जवळच देवीचे मंदिर आहे. तिथेच गगनगिरी महराजांच्या शिष्यांनी बांधलेला एक आश्रम आहे. इथे राहण्याची सोय होऊ शकते.
गडाच्या पश्चिम भागाकडील माची निमुळती आहे. बावधनच्या रांगेवरून इथून गडावर मारा करता येतो म्हणून तटबंदी बांधून भक्कम करून घेण्यात आली आहे व मध्येच तटबंदी घालून तिला मुख्य गडापासून वेगळे केले आहे. इथेच एक चोरवाट आपल्याला आढळते. इथून दोराच्या सहाय्याने म्हसवे या बाजूस उतरून जाता येते.
वाई हे शहर अफझलखान वधानंतर मुख्यत मराठय़ांच्या ताब्यात राहिले. 1699 साली औरंगजेबाचा सरदार `हमीदुद्दिनखान’ याने हा किल्ला जिंकून घेतला व औरंगजेबाने या किल्ल्याचे नाव `शर्जागड’ असे ठेवले. पुढे पेशवाईत मराठय़ांकडे व 1818 नंतर इंग्रजांकडे हा किल्ला गेला. वाईजवळ हा किल्ला असल्याने सहज एका दिवसात हा किल्ला बघून येण्यासारखा आहे!
Comments are closed.