निमित्त – किरकोळ दुकानदार संकटात

>> प्रसाद पाटील
ऑनलाईन शॉपिंगमुळे किरकोळ दुकानदारांना घरघर लागत आहे. सुईपासून ते चारचाकी वाहनांर्यंत सर्व काही ऑनलाईन बुकिंग होत असल्याने ग्राहकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढत दुकानापर्यंत जाण्याची गरजच राहिलेली नाही. परिणामी किरकोळ दुकानदार अडचणीत आले असून अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
खरेदीचा मुद्दा भारतीय समाजाच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक राहिला आहे. पारंपरिक रूपातून लोक बाजारात जाऊन दुकानदारांकडून सामान खरेदी करतात. मात्र बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे ग्राहकांच्या विचारात व सवयीत बदल झाला आहे. आता ग्राहक केवळ चांगले सामान आणि वाजवी भावाच्या शोधात नाही, तर चांगला व्यवहार आणि अनुभवाच्या शोधात असतात. यात भरीसभर म्हणजे काही उद्धट दुकानदारांचा अनुभव हा ग्राहकांना ऑनलाईन शॉपिंगकडे नेत आहे. ऑनलाईन शॉपिंगमुळे ग्राहकांना खरेदीचे स्वातंत्र्य मिळाले आहे. यात कोणत्याही कटकटीशिवाय आणि मनपसंत तसेच परवडणाऱया किमतीत खरेदीची मुभा राहते. या कारणांमुळेच ऑनलाईन शॉपिंगचा पारंपरिक बाजारावर प्रभाव पडताना दिसत आहे.
तज्ञाच्या मते, ऑनलाईन कंपन्या वेळोवेळी ऑफर आणि सवलत देऊन ग्राहकांना दिलासा देत असतात. त्याचवेळी 24 तास उपलब्ध राहणारी सेवा ग्राहकांचा वेळ वाचविणारी ठरत आहे. रिटेल तज्ञांच्या मते, आजचे ग्राहक केवळ सामान खरेदी करत नाहीत, तर अनुभवालादेखील तितकेच महत्त्व देत आहेत. भारतात ऑनलाईन शॉपिंगला ई-कॉमर्स असेही म्हटले जाते. हा बाजार वेगाने वाढत आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या संख्येमुळे (2024 मध्ये 95 कोटी लोकांकडून इंटरनेचा वापर) आणि डिजिटल पेमेंट म्हणजेच यूपीआयमुळे ऑनलाईन बाजाराचे प्रस्थ वाढताना दिसत आहे.
2025 च्या प्रारंभीच्या काळात म्हणजे सप्टेंबरपर्यंत ई-कॉमर्सचा बाजार विविध बातम्यांचा संदर्भ घेतला तर दहा ते साडेबारा लाख कोटी रुपयांच्या आसपास पोहोचलेला दिसून येतो. हे आकडे जीएमव्हीवर आधारित असून ते एकूण विक्री मूल्य सांगण्याचे काम करतात. ई-कॉमर्समध्ये बाजाराचा अर्थ जीएमव्ही असून ते एकूण उलाढाल सांगते. 2024 मध्ये ऑनलाईन बाजाराचे मूल्य दहा ते बारा लाख कोटी रुपये होते आणि ते चालू आर्थिक वर्षात 19 ते 23 टक्क्यांनी वाढून अकरा ते साडेबारा लाख कोटी रुपये राहू शकते. 2024 मध्ये यूपीआय व्यवहाराचे मूल्य मे महिन्यातच 25.14 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून त्यात ई-कॉमर्सचा मोठा वाटा आहे. त्याचवेळी सबक्रिप्शन ई-कॉमर्सची उलाढाल 2024 मध्ये 99,497 कोटी रुपये राहिली असून एका अंदाजानुसार 2025 ते 2033 या काळात त्यात वार्षिक 45 टक्के दराने वाढ होणे अपेक्षित आहे. क्विक कॉर्मसचा बाजार 2025 पर्यंत सुमारे 45 हजार कोटी रुपयांवर पोहोचू शकतो. मात्र हा विकास दुकानदारांसाठी विशेषतः किराणा दुकानदारांच्या मुळावर येत असल्याचे दिसून येते.
लहान दुकानदार हे किरकोळ बाजाराचा कणा मानला जातात. देशात सध्या 1.3 कोटी किराणा दुकानदार असून ते ‘एफएमसीजी सेल्स’मध्ये 88 टक्के वाटा उचलतात, परंतु आता ऑनलाईन बाजारामुळे रिटेलचा बाजार संकुचित होत आहे. परिणामी किरकोळ दुकानदारांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. क्विक कॉमर्सने किराणा बाजारावर 25 ते 30 टक्के हुकमत मिळवली आहे आणि त्यामुळे अनेक दुकानदारांच्या महसुलात 40 ते 45 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्टस डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या मते, गेल्या वर्षात सुमारे दोन लाख किराणा दुकाने बंद पडली आणि विशेष म्हणजे ही दुकाने मेट्रो सिटीतील होती. एकूणच तीस दशलक्ष किराणा दुकानदारांपैकी काही जण अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. म्हणून दुकानदारांची उपजीविकाच नाही, तर स्थानिक रोजगारांतदेखील घट होत आहे. ‘ईलारा कॅपिटल’च्या अहवालानुसार, डिस्ट्रिब्युटर्सनादेखील वसुलीत अडचणी येत आहेत. किराणा दुकानदारांकडून थकबाकी मिळवताना नाकीनऊ येत आहे. कारण दुकानदारांकडे पैशांची चणचण भासत आहे. लहान शहरात क्विक कॉमर्सचे प्रमाण वाढत असताना तेथे ही समस्या अधिक जाणवत आहे. एकूणच लहान दुकानदारांच्या उपजीविकेचे साधन हिरावले जात आहे.
Comments are closed.