इफ्फी 2026 मध्ये ‘पेज से पिच तक’ स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा; अविशेष झा प्रथम; ‘मिर्ची केक’ पटकथेला 5 लाखांचे पारितोषिक – TMarathiNews

पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी 2026) निमित्ताने प्रसार भारतीतर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘पेज से पिच तक’ या पटकथा सादरीकरण उपक्रमातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. पणजी येथील कला अकादमीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अविशेष झा यांनी ‘मिर्ची केक’ या पटकथेसाठी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. सत्य व्यास यांनी ‘संहार’ या पटकथेसाठी द्वितीय क्रमांक मिळवत 3 लाख रुपये, तर जितेश ठाकूर यांनी ‘शरद पूर्णिमा’ या पटकथेसाठी तृतीय क्रमांक मिळवत 2 लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.

प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. देशातील नवोदित लेखकांना त्यांच्या मूळ कथांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे आणि चित्रपटसृष्टीशी जोडण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. दहा भारतीय भाषांमध्ये फीचर फिल्म, माहितीपट आणि लघुपट या तीन प्रकारांतील पटकथांना यामध्ये संधी देण्यात आली. विशेष म्हणजे, या उपक्रमाच्या घोषणेनंतर अवघ्या दहा दिवसांत जवळपास एक हजार पटकथा प्राप्त झाल्या. यावरून देशातील तरुण लेखकांमधील सर्जनशीलता आणि कथाकथनाची क्षमता स्पष्ट झाली.

या पुरस्कार वितरण सोहळ्याला माहिती व प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव पृथुल कुमार आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह उपस्थित होते. यावेळी पृथुल कुमार यांनी नवोदित कथालेखकांमधील प्रतिभा ओळखून तिला प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली. भारतातील तरुणाईकडे असलेल्या सर्जनशील क्षमतेचा उपयोग करून त्यांच्या कल्पना आणि कथा पुढे आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट निर्मितीची सुरुवात पटकथेपासून होते. नियोजन हा चित्रपट निर्मितीचा मूलभूत भाग असून प्रभावी पटकथा आणि सशक्त कथा ही यशस्वी चित्रपटाची पायाभरणी असते, असेही त्यांनी नमूद केले.

दूरदर्शनच्या महासंचालक रीना सोनवाल कौली यांनी स्वागतपर भाषणात या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. भारतातील भाषिक आणि सर्जनशील वैविध्याला राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच नवोदित लेखकांना त्यांच्या मूळ संकल्पना सादर करण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत अंतिम फेरीसाठी निवडलेल्या दहा स्पर्धकांनी मान्यवर परीक्षक मंडळासमोर आपल्या मूळ पटकथा सादर केल्या. या परीक्षक मंडळात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते मनोज जोशी, लेखक व स्वतंत्र संशोधक संदीप बालकृष्ण, ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालू’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक व संकलक श्री नारायण सिंह तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते पत्रकार, लेखक आणि चित्रपट समीक्षक अनंत विजय यांचा समावेश होता.

पहिल्या तीन विजेत्यांव्यतिरिक्त चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील स्पर्धकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात आले. सातव्या ते दहाव्या क्रमांकावरील स्पर्धकांना प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. तसेच अंतिम निवड झालेल्या सर्वोत्तम 30 लेखकांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

21 ते 23 नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘पेज से पिच तक’ या उपक्रमाचा मुख्य उद्देश नवोदित लेखक आणि चित्रपट उद्योग यांच्यातील दरी कमी करणे हा आहे. लेखकांच्या कल्पनांना प्रत्यक्ष पडद्यावर आणण्यासाठी निर्माते आणि चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांशी जोडण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा प्रसार भारतीचा मानस असून, यामुळे फीचर फिल्म, माहितीपट आणि लघुपट निर्मितीसाठी नव्या प्रतिभावान लेखकांना संधी मिळणार आहे.

Comments are closed.