केवळ दोन चेंडूमध्ये हॅट्ट्रीक! ‘या’ भारतीय गोलंदाजाने रचला इतिहास, नंतर केले बॅन

लवकरच इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२६) १९ वा हंगाम सुरु होणार आहे. यामध्ये पहिला सामना २८ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद असा खेळला जाणार आहे. आतापर्यंत १८ आयपीएल हंगाम खेळले गेले. त्यामध्ये एकूण २३ हॅट्ट्रीकची नोंद झाली आहे, मात्र एक हॅट्ट्रीक विशेष आहे. तो एक विक्रम असून तोडणे अशक्य आहे.
आयपीएलमध्ये पदार्पण करणारा सर्वात वयस्कर खेळाडू प्रवीण तांबे आहे. त्यानेही ही विशेष हॅट्ट्रीक घेतली होती.

क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा गोलंदाज लागोपाठ ३ चेंडूवर ३ विकेट्स घेत असेल तर त्याला हॅट्ट्रीक म्हणतात, मात्र प्रवीणने २ चेंडूमध्येच हॅट्ट्रीक घेत वेगळाच विक्रम केला आहे. ही कामगिरी त्याने २०१४च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केली होती. त्याने २ चेंडूंमध्ये कशी काय हॅट्ट्रीक घेतली ते जाणून घेऊ.

प्रवीणने त्या सामन्याच्या १६ व्या षटकात हॅट्ट्रीक घेतली. त्याने पहिला चेंडू गुगली टाकला असता मनिष पांडेने येथे चूक केली आणि विकेटकीपर संजू सॅमसनने त्याला स्पम्प केले असता तो बाद झाला. तो चेंडू वाईड होता, मात्र प्रवीणला विकेट मिळाली. हा चेंडू मोजला गेला नाही. त्यानंतर पहिल्या अधिकृत चेंडूवर त्याने युसफ पठाणला बाद केले आणि दुसऱ्या अधिकृत चेंडूवर रयान टेन डोशेटची विकेट (LBW) घेतली. अशाप्रकारे प्रवीणने २ चेंडूतच हॅट्ट्रीक घेण्याची कामगिरी पूर्ण केली.

टी२० क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच घडले नाही. २०१०च्या चॅम्पियन्स लीग टी२० मध्ये इसुरू उदाना यानेही २ चेंडूत हॅट्ट्रीक घेतली होती. त्यामुळे अशी कामगिरी करणारा प्रवीण दुसरा गोलंदाज बनला. त्या सामन्यात त्याने ४ षटकात २६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

त्या सामन्यात केकेआरला जिंकण्यासाठी राजस्थानने १७१ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते. तो सामना केकेआरने १० धावांनी गमावला. या पराभवानंतर त्यांच्यावर एका विचित्र विक्रमाची नोंद झाली. केकेआर हा पहिला संघ ठरला ज्यांनी सलामीला १०० धावांची भागीदारी केली आणि तरीही सामना गमावला. प्रवीण सामनावीर ठरला होता.

प्रवीणने आयपीएलची सुरूवात वयाच्या ४१व्या वर्षी केली. त्याने २०१३ ते २०१६ हे हंगाम खेळले. त्यादरम्यान त्याने ३३ सामन्यात खेळताना २८ विकेट्स घेतल्या. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त न होताच, अनधिकृत परदेशी लीगमध्ये सहभागी झाल्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर बंदी आणली आहे.

Comments are closed.