राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ!
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार एंट्री केली असून आज अनेक भागांना वादळी पावसाने झोडपून काढले. पुढील तीन ते चार दिवस हीच स्थिती राहणार असून कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशीव जिह्यांना खबरदारीचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईत मात्र दमट, ढगाळ वातावरण राहणार असून उकाडा जाणवणार असल्याचेही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ासह राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘यलो अलर्ट’ जारी केलेल्या जिह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments are closed.