माहेरून परतत असताना काळाचा घाला, दुभाजकावर धडकून कार पेटली; सहा महिन्यांच्या गर्भवतीचा होरपळून मृत्यू

माहेरून परतत असताना कारला लागलेल्या भीषण आगीत सहा महिन्यांच्या गर्भवतीचा जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर वाकोदजवळील पिंपळगाव फाटा येथे ही घटना घडली. जान्हवी संग्राम मोरे (21) असे मयत महिलेचे नाव आहे. पतीला वाचवण्यास नागरिकांना यश आले आहे.
भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथील माहेरून जान्हवी पतीसोबत कारने छत्रपती संभाजी नगरकडे घरी परतत होती. यादरम्यान पिंपळगाव फाटा येथे त्यांच्या कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर धडकली. यानंतर कारने पेट घेतला. आसपासच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत गाडीच्या काचा फोडून पतीला बाहेर काढले. नागरिकांनी पत्नीलाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत गाडीने पेट घेतला. या आगीत जान्हवीचा होरपळून मृत्यू झाला.
घटनास्थळी सामाजिक कार्यकर्त्यांसह पहुर पोलीस, महामार्ग पोलीस, आरटीओ, वाकोद पोलीस पाटील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. वाकोद येथील ट्रॅक्टर मागवून आग विझवली. नंतर काही वेळात जामनेर येथील अग्निशमन दलाची गाडी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले.

Comments are closed.