परीक्षा पद्धतीत बदल करण्याची तयारी
नंदन नीलेकणींच्या नेतृत्त्वाखालील टास्क फोर्सने जनतेकडून मागविल्या सूचना : 13 सप्टेंबरपर्यंत मुदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारच्या सहा सदस्यीय उच्चाधिकार कार्यदलाने (टास्क फोर्स) सार्वजनिक परीक्षांमध्ये व्यापक सुधारणांसाठी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि नागरी समाज संघटनांकडूनही मते मागवण्यात आली आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखालील हे टास्क फोर्स विशेषत: एनटीए परीक्षांचे आयोजन, सुरक्षा, परीक्षेची रचना आणि प्रणाली सुधारण्यावर काम करत आहे.
केंद्रीय कार्मिक मंत्रालयाच्या मते, परीक्षा प्रणाली सुरक्षित, पारदर्शक, निष्पक्ष आणि भविष्यासाठी सज्ज करणे हे कार्यदलाचे उद्दिष्ट आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखणे, संस्थात्मक यंत्रणा मजबूत करणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि विद्यार्थ्यांची गैरसोय कमी करणे यांसारख्या मुद्यांवर सूचना मागवल्या जात आहेत. सदर प्रस्ताव सर्वसामान्य जनतेला 13 सप्टेंबरपर्यंत सादर करता येतील. सूचना इंग्रजी, हिंदी किंवा प्रादेशिक भाषांमध्ये पाठवता येतील. सरकारने आपल्या वेबसाईट, फोन, व्हॉट्सअॅप आणि ईमेलद्वारे सूचना सादर करण्याची व्यवस्था केली आहे. ExamReformsTaskforce@dopt.gov.in या संकेतस्थळावर सूचना पाठवता येतील. तसेच 1800-180-4747 या क्रमांकावर फोन करून किंवा 7827042830 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपवर ‘एचपीटीएफ’ पाठवूनही सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सूचनांच्या आधारे टास्क फोर्स नजिकच्या काळात परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सरकारला आपल्या शिफारसी सादर करेल.
नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यदल
प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांवरून आणि परीक्षा पद्धतीत बदल करण्याच्या मागणीवरून जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जुलैमध्ये नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यदल स्थापन केले. नीलेकणी यांच्या व्यतिरिक्त या कार्यदलात माजी गुप्तचर संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ, आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामाकोटी, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल आणि लॉजिस्टिक्स तज्ञ अमृतलाल मीणा यांचा समावेश आहे.
‘एनटीए’मध्ये तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
पेपरफुटी प्रकरणानंतर शुक्रवारी राष्ट्रीय चाचणी संस्थेमध्ये (एनटीए) तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये दोन संचालक आणि एका सहसंचालकाचा समावेश आहे. आयपीएस अधिकारी रवी कुमार सिंग आणि आयएएस अधिकारी प्रसन्न वेंकटेश व्ही. यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 2016 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी अमित समदरिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या नियुक्त्यांसंबंधीचा आदेश 27 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला असून शनिवारी यासंबंधीची माहिती उघड झाली. 2016 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी अमित समदरिया हे सहसंचालक असतील. या तिन्ही अधिकाऱ्यांनी आदेशाच्या तारखेपासून तीन आठवड्यांच्या आत आपापली पदे स्वीकारणे बंधनकारक आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर एनटीएमध्ये फेरबदल सुरू झाले आहेत. 25 जुलै रोजी पेपरफुटी प्रकरणी 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते.
खालील मुद्यांवर मागविल्या सूचना…
पेपरफुटी आणि प्रश्नपत्रिकांमधील फेरफार कसे ओळखावे?
परीक्षेचे मूल्यांकन कसे सुधारावे? पारदर्शकता कशी वाढवावी?
परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थांचे उत्तरदायित्व कसे ठरवावे?
सीबीटी परीक्षांमध्ये तांत्रिक सुरक्षा कशी सुनिश्चित करावी?
परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची सोय-सुविधा कशी सुधारावी?
परीक्षासंबंधींच्या तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण कसे करावे?
सूचना कोण पाठवू शकतात?
विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्वसामान्य लोक
सूचना पाठविण्याची भाषा…
हिंदी, इंग्रजी आणि इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेत
प्रस्ताव पाठविण्याचे माध्यम-संपर्क क्रमांक…
ई-मेल: ExamReformsTaskforce@dopt.gov.in
व्हॉट्सअॅप : “hptf” to +91 78270 42830
फोन: 1800-180-4747
सूचना सादर करण्याची अंतिम मुदत 13 सप्टेंबर
Comments are closed.