करण जोहरच्या भव्य सिनेमाची तयारी सुरू; महाभारतातील भीम आता मोठ्या पडद्यावर अवतरणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

करण जोहर पुन्हा एकदा मोठ्या बजेटच्या प्रोजेक्टसह प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत आहे. महाभारताच्या कथेतला पराक्रमी योद्धा भीम आता आधुनिक अंदाजात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शन्सकडून ‘गदाधारी भीम’ नावाची मॉडर्न मायथॉलॉजिकल सुपरहिरो अॅक्शन-ड्रामा फिल्म बनवली जाणार असल्याचे वृत्त आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अभिषेक वर्मन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथेवर काम पूर्ण झाले असून स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. अभिषेक वर्मन यांनी यापूर्वी ‘2 स्टेट्स’ आणि ‘कलंक’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे पौराणिक कथा आणि सुपरहिरो अॅक्शनचा हा नवा प्रयोग त्यांच्या कारकिर्दीतील वेगळे वळण ठरणार आहे.

या भव्य प्रोजेक्टसाठी निर्माते मोठ्या स्टारची निवड करण्याच्या तयारीत आहेत. भीमाची भूमिका साकारण्यासाठी ए-लिस्ट अभिनेत्याचा शोध सुरू होणार असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप कोणत्याही अभिनेत्याचे नाव अधिकृतपणे समोर आलेले नाही.

‘गदाधारी भीम’ हा मोठ्या बजेटमध्ये तयार होणारा एपिक ड्रामा असणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्ससाठीही हा प्रोजेक्ट खास आहे, कारण ही कंपनीची पहिली सुपरहिरो फिल्म ठरण्याची शक्यता आहे. करण जोहर आणि अभिषेक वर्मन यांचे हे तिसरे सहकार्य असेल. याआधी दोघांनी ‘2 स्टेट्स’ आणि ‘कलंक’ या चित्रपटांवर एकत्र काम केले आहे. आता या चित्रपटाची कास्टिंग प्रक्रिया सुरू होणार असून मुख्य भूमिकेसाठी कोणता अभिनेता बाजी मारतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. कास्टिंग निश्चित झाल्यानंतर चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे.

Comments are closed.