ODI वर्ल्ड कप 2027 मध्ये मोठा उलटफेर! इतिहासात पहिल्यांदाच यजमान देश स्पर्धेतून बाहेर पडणार?

2027 च्या वनडे वर्ल्ड कपची (ODI World Cup 2027) तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. स्पर्धा पुढच्या वर्षी असली तरी, सध्या सर्वांचे लक्ष आयसीसी (ICC) रँकिंगवर आहे, ज्यावर संघांचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी एक गोष्ट घडू शकते जी यापूर्वी कधीही घडलेली नाही. प्रश्न असा आहे की, ज्या देशात वर्ल्ड कप होणार आहे, तोच देश या स्पर्धेतून बाहेर पडणार का? याची शक्यता कमी असली तरी सध्याची समीकरणं समजून घेण्यासारखी आहेत.

पुढच्या वर्षीचा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया या तीन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. यजमान असल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेला स्पर्धेत थेट प्रवेश (Direct Entry) मिळाला आहे, पण नामीबियाची संधी हुकली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे नामीबिया हा आयसीसीचा ‘पूर्ण सदस्य’ (Full Member) नाही. नामीबियाला वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी ‘क्वालिफायर’ फेरी पार करावी लागेल. जर हा संघ तिथे हरला, तर वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा यजमान देश मुख्य स्पर्धेत नसेल.

आयसीसीच्या नियमानुसार, वर्ल्ड कपचे यजमानपद मिळाल्यावर फक्त त्याच देशांना थेट प्रवेश मिळतो जे आयसीसीचे पूर्ण सदस्य आहेत. नामीबिया हा ‘असोसिएट सदस्य’ असल्याने त्यांना पात्रता फेरी (Qualifiers) खेळावीच लागेल. 1975 च्या पहिल्या वर्ल्ड कपपासून 2023 पर्यंतच्या इतिहासात असे कधीही घडले नाही की, एखाद्या यजमान देशाला थेट प्रवेश मिळाला नसेल.

1999 मध्ये वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये झाला होता, पण स्कॉटलंड, आयर्लंड आणि नेदरलँड्समध्येही काही सामने झाले होते. तेव्हा स्कॉटलंडला थेट प्रवेश नव्हता, त्यांना क्वालिफायर खेळावे लागले होते. तसेच 2003 मध्ये केनिया सह-यजमान होता, पण त्यांनी क्वालिफायर खेळून आपली जागा निश्चित केली होती.

महत्वाची गोष्ट म्हणजे, ‘यजमान असणे’ आणि ‘काही सामने आयोजित करणे’ यात फरक आहे. 1999 मध्ये मुख्य यजमान फक्त इंग्लंड होता, इतर देशांत केवळ क्रिकेटच्या प्रचारासाठी सामने ठेवले होते. पण 2027 मध्ये नामीबिया हा ‘अधिकृत यजमान’ (Official Host) आहे. अशा प्रकारे अधिकृत यजमान असूनही स्पर्धेतून बाहेर पडणारा नामीबिया हा पहिला देश ठरू शकतो. आयसीसीचा एखादा असोसिएट सदस्य वर्ल्ड कपचे अधिकृत यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या नामीबियाचा संघ क्वालिफायर लीग-2 च्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे, ज्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास खूप कठीण दिसत आहे. आता त्यांना ‘प्ले-ऑफ’च्या माध्यमातून आपली जागा बनवावी लागेल. नामीबिया वर्ल्ड कप खेळणार की बाहेर पडून नवा इतिहास रचणार, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.