स्टारलिंकला भारतात प्रवेश करण्याची परवानगी देण्याची तयारी

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अमेरिकेतील जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ या कंपनीच्या ‘स्पेसएक्स’ सेवेला भारतात प्रवेश देण्याची तयारी भारत सरकारने दाखविली आहे. तशा प्रकारचे इच्छादर्शक पत्र केंद्र सरकारने या कंपनीला पाठविले आहे. या कंपनीची स्थापना मस्क यांनी 2002 मध्ये केली होती. ही कंपनी अतिवेगवान उपग्रहीय इंटरनेट सेवा प्रदान करण्यामध्ये जगात प्रसिद्ध आहे. हे इच्छादर्शन पत्र भारताच्या दूरसंचार विभागाने पाठविले आहे. यापूर्वी केंद्र सरकारने वेगवान इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी अनुमतीपत्रे युटेलसॅट वन वेब आणि जिओ सॅटॅलाईट कम्युनिकेशन्स या दोन कंपन्यांना देण्यात आली आहेत. आता सकारात्मक स्पर्धा निर्माण करण्यासाठी स्टारलिंकलाही आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. इतर नेहमीच्या उपग्रहीय इंटरनेट सेवांपेक्षा स्टारलिंकचे तंत्रज्ञान भिन्न आहे. इतर कंपन्या पृथ्वीपासून बऱ्याच लांब अंतरावर असणाऱ्या भूस्थिर उपग्रहांचा उपयोग या सेवेसाठी करतात. तथापि, स्टारलिंक पृथ्वीच्या जवळून परिभ्रमण करणाऱ्या निम्नकक्षा उपग्रहांचा उपयोग करते. यामुळे या कंपनीची सेवा अधिक वेगवान आणि कमी खर्चात उपलब्ध होते, असे तज्ञांचे मत आहे.

चर्चेनंतरच निर्णय होणार

स्टारलिंकला भारतात प्रवेश देण्याची सरकारची तयारी असली तरी अंतिम निर्णय विचारपूर्वकच घेतला जाणार आहे. कारण, हा मुद्दा काहीसा जटील आहे. कारण भारतात काही कंपन्या ही सेवा पूर्वीपासून उपलब्ध करुन देत आहेत. मात्र, स्टारलिंक भारतात आल्यास उपग्रहीय इंटरनेट सेवाक्षेत्राची गुणवत्ता अधिक होऊ शकते, असे भारतातील काही जाणकारांचे मत आहे, अशी माहिती देण्यात आली.

Comments are closed.