ट्रम्प यांची स्वतःवरच स्तुतीसुमने! ओबामा, बायडेन यांना अपयशी ठरवत स्वतःला सिद्ध केले अव्वल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला देशाचे सर्वश्रेष्ठ राष्ट्राध्यक्ष म्हटले आहे. गुरुवारी, ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राष्ट्राध्यक्षांची एक क्रमवारी शेअर केली, ज्यात त्यांनी स्वतःला अव्वल स्थानी ठेवले आहे.
सोशल मिडीयावर पोस्ट केलेल्या या इमेजमध्ये, ट्रम्प यांनी सर्वश्रेष्ठ (The Greatest) नावाची एक वेगळी श्रेणी तयार करण्यात आली आहे, त्यात फक्त त्यांचे नाव आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांना अपयशी (Failures) ठरवण्यात आले आहे.
ट्रम्प यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना सहा श्रेणींमध्ये विभागले आहे: “सर्वश्रेष्ठ,” “महान,” “जवळपास महान,” “सरासरी,” “सरासरीपेक्षा कमी,” आणि “अपयशी.”
ट्रम्प यांनी अब्राहम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टन आणि फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांसारख्या राष्ट्राध्यक्षांना ‘महान’ श्रेणीत सूचीबद्ध केले आहे. या यादीत थॉमस जेफरसन, अँड्र्यू जॅक्सन आणि वुड्रो विल्सन यांचाही समावेश आहे. थिओडोर रुझवेल्ट, ग्रोव्हर क्लीव्हलँड, जॉन ॲडम्स आणि जेम्स के. पोल्क यांना ‘जवळपास महान’ श्रेणीत सूचीबद्ध केले आहे.
ट्रम्प यांच्या क्रमवारीनुसार बिल क्लिंटन “सामान्य” श्रेणीत आहेत. या यादीत जॉन क्विन्सी ॲडम्स, जेम्स मन्रो, जेम्स मॅडिसन आणि हर्बर्ट हूवर यांचाही समावेश आहे. इतर अनेक माजी राष्ट्राध्यक्षांनाही या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. “सरासरीपेक्षा कमी” श्रेणीत जॉन टायलर, कॅल्विन कूलिज, मिलार्ड फिलमोर, जॅकर टेलर, जेम्स बुकानन आणि फ्रँकलिन पियर्स यांचा समावेश आहे.
ट्रम्प यांच्या यादीत जो बायडेन आणि बराक ओबामा यांना सर्वात खालच्या “अपयशी” श्रेणीत ठेवण्यात आले आहे. या श्रेणीतील इतरांमध्ये युलिसिस एस. ग्रँट, वॉरन जी. हार्डिंग आणि जिमी कार्टर यांचा समावेश आहे.
तथापि, या क्रमवारीतून अनेक प्रमुख व्यक्ती वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये हॅरी ट्रुमन, ड्वाइट आयझेनहॉवर, जॉन एफ. केनेडी, लिंडन जॉन्सन, रिचर्ड निक्सन, जेराल्ड फोर्ड, रोनाल्ड रेगन आणि जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचा समावेश आहे.
Comments are closed.