Padma Awards 2026 गायिका अलका याज्ञिक, अभिनेते मामुटी…राष्ट्रपती आज प्रदान करणार ६५ जणांना पद्म पुरस्कार

२०२६ सालचे भारत सरकारचे पद्म पुरस्कार राष्ट्र्रपती द्रौपदी मुर्मू मंगळवारी विशेष कार्यक्रमात प्रदान करतील. यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये गायिका अलका याज्ञिक, माजी मंत्री दिवंगत शिबू सोरेन आणि अभिनेते मामूटी यांचा समावेश आहे.

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच सुरू होणार आहे.

पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण

दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात राष्ट्रपती दोन पद्मविभूषण, सात पद्मभूषण आणि ५६ पद्मश्रींसह एकूण ६५ पद्म पुरस्कार प्रदान करतील. २५ मे रोजी झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात राष्ट्रपतींनी दोन पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि ५७ पद्मश्री पुरस्कारांसह एकूण ६५ पद्म पुरस्कार प्रदान केले होते.

देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेले पद्म पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. हे पुरस्कार कला, समाजसेवा, सार्वजनिक बांधकाम, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये दिले जातात.

‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार अपवादात्मक आणि विशेष सेवेसाठी, ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार उच्च दर्जाच्या विशेष सेवेसाठी आणि ‘पद्मश्री’ हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रातील विशेष सेवेसाठी दिला जातो. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर केले जातात.

शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण

माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) संस्थापक शिबू सोरेन यांची मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे, तर पी. नारायणन आणि निवृत्त न्यायमूर्ती के. टी. थॉमस यांना साहित्य, शिक्षण आणि सार्वजनिक सेवेसाठी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

पुरस्कार विजेत्यांच्या यादीत दोन अमेरिकन, एक रशियन आणि एक जॉर्जियन यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे डॉ. दत्तात्रेयुडू नोरी यांना वैद्यकीय क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल. प्राध्यापक प्रतीक शर्मा यांना वैद्यकीय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

रशियाच्या ल्युडमिला खोखलोवा यांची साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जॉर्जियाचे व्लादिमीर मेस्टविरिशविली यांना क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित केले जाईल. पश्चिम बंगालचे प्राध्यापक महेंद्रनाथ रॉय यांची विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे

Comments are closed.