राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भव्य स्वागत करण्यात आले
पंतप्रधान मोदी स्वत: विमानतळावर उपस्थित : स्नेहभोजनासह द्विपक्षीय चर्चा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे भारतात भव्य स्वागत करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर त्यांचे गुरुवारी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानळावर संध्याकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. पुतीन विमानामधून उतरताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामोरे जाऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन देऊन विचारपूस केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी उपस्थित मान्यवरांच्या अभिवादनाचा स्वीकारही केला. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक भारतीय नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.
या नृत्य कार्यक्रमांचे काही काळ निरीक्षण करुन दोन्ही नेते विमानतळावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी एकाच कारमधून रवाना झाले. पुतीन यांची वास्तव्याची व्यवस्था ‘मौर्या हॉटेल’ येथे करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानीही त्यांचे स्वागत करण्यात आले. पुतीन हे सुमारे 30 तास भारतात राहणार आहेत. पुतीन यांच्या आगमनापूर्वीच अनेक रशियन मंत्री दिल्लीत पोहोचले होते. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मांटुरोव्ह, संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु आणि कृषीमंत्री दिमित्री पेट्रोव्ह यांचा समावेश आहे. तसेच अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही भारतात दाखल झालेले असून ते वेगवेगळ्या शिष्टमंडळांसमवेत चर्चा करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा
रात्री सव्वाआठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांनी एकमेकांशी प्रत्यक्ष चर्चा केली. ही चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी करण्यात आली. निवासस्थानी येत असताना कारमध्येही त्यांनी काही काळ चर्चा केली. मात्र, ती कोणती चर्चा होती, याची माहिती सध्यातरी गुप्त ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पुतीन यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पुतीन यांच्या समवेत रशियाचे एक मोठे शिष्टमंडळही भारतात आलेले असून ते स्वतंत्र चर्चेत सहभागी होणार आहे, अशी माहिती भारताच्या विदेश व्यवहार विभागाकडून देण्यात आली आहे.
स्नेहभोजनाचा कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी शाही स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला या दोन नेत्यांप्रमाणेच इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली आहे. या भोजनप्रसंगीही दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा झाली.
युक्रेन युद्धानंतर प्रथम दौरा
2022 मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा प्रारंभ झाला होता. ते युद्ध आजही होत आहे. या युद्धाचा प्रारंभ झाल्यानंतरची ही व्लादिमीर पुतीन यांची प्रथम भारत भेट आहे. सध्याच्या आव्हानात्मक जागतिक परिस्थितीच्या काळात ती होत आहे. त्यामुळे या भेटीचे विशेष महत्व आहे. अमेरिकेच्या व्यापार कर धोरणामुळे भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये काहीसे वेगळेपण आलेले असताना पुतीन यांचा हा भारत दौरा होत आहे. त्यामुळे या दौऱ्याला मोठा अर्थ प्राप्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केली.
आज भरगच्च कार्यक्रम
आज शुक्रवारी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे दिल्लीत भरगच्च कार्यक्रम आहेत. राष्ट्रपती भवनात त्यांचे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय आणि प्रतिनिधीमंडळांच्या चर्चेत सहभागी होतील. या बैठकीत भारतातले काही प्रख्यात उद्योगपतीही समाविष्ट होणार आहेत. दुपारनंतर दोन्ही नेते उद्योग कार्यक्रमात (बिझनेस फोरम) सहभागी होणार आहेत. रात्री त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रपती भवनात त्यांच्यासाठी शाही भोजनाचा कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेला आहे. यानंतर शुक्रवारी रात्रीच अध्यक्ष व्लादिमीर पुतीन परतीच्या प्रवासासाठी निघणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी स्वत: स्वागत केलेले नेते
- 25 जानेवारी 2015 : अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा
- 7 एप्रिल 2017 : बांगलादेशच्या नेत्या शेख हसीना
- 13 सप्टेंबर 2017 : जपानचे तत्कालीन नेते शिंजो आबे
- 24 फेब्रुवारी 2020 : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
- 9 जानेवारी 2024 : संयुक्त अरब अमिरात अध्यक्ष शेख मोहम्मद
- 17 फेब्रुवारी 2025: कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी
- 4 डिसेंबर 2025 : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन
Comments are closed.