सबरीमाला मंदिराला भेट देण्याचे अध्यक्ष
भगवान अयप्पा यांचे दर्शन घेणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती ठरणार
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी केरळच्या शबरीमला मंदिरात भगवान अयप्पा यांचे दर्शन घेत पूजा करणार आहेत. देशाच्या इतिहासात शबरीमला मंदिरात जाणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरणार आहेत. मंदिर व्यवस्थापन संस्था त्रावणकोर देवस्मोम बोर्डाने (टीडीबी) राष्ट्रपतींच्या दौऱ्याची पुष्टी दिली आहे. तसेच या दौऱ्याला देशाच्या इतिहासातील गर्वाचा क्षण ठरविले आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यावरुन एसपीजी आणि मंदिर व्यवस्थापनाने तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रपती मुर्मू 18-19 मे रोजी केरळच्या दौऱ्यावर असणार आहेत. 18 मे रोजी मुर्मू केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील एका कार्यक्रमात भाग घेणार आहेत. यानंतर 19 मे रोजी सकाळी शबरीमला मंदिरानजीक निर्मित निलक्कल हेलिपॅडवर त्या पोहोचतील. तेथून त्या पंपा बेस कॅम्पमध्ये दाखल होणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू या सामान्य भाविकांप्रमाणे पर्वत चढून जाऊ शकतात. याचमुळे एसपीजी विशेष सुरक्षा उपायांवर लक्ष देत आहे.
एखाद्या राष्ट्रपतीचे शबरीमला मंदिरात आगमन होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. पर्वतावर सामान्य भाविकांप्रमाणे चढून येण्याचा निर्णय एसपीजी घेणर आहे. आम्ही निर्देशांचे पालन करण्यासाठी तयार आहोत. राष्ट्रपतींचा अधिकृत कार्यक्रम अद्याप प्राप्त झालेला नाही, परंतु तयारी सुरू आहे. आम्ही रस्त्यांची दुरुस्ती आणि निर्मितीकार्ये सुरू करविली आहेत. अधिकृत कार्यक्रम कळल्यावर मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे बैठक बोलावतील अशी माहिती टीडीबीचे अध्यक्ष पी.एस. प्रशांत यांनी दिली आहे.
18-19 मे रोजी मंदिरात भाविकांना दर्शन करता येणार नाही. याकरता क्यूआर तिकीट सेवांना देखील बंद करण्यात आले आहे. शबरीमला मंदिरात प्रार्थना करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती असतील, हा गर्वाचा क्षण असल्याचे प्रशांत यांनी म्हटले आहे.
केरळच्या पथनामथिट्टा जिल्ह्यात 3 हजार फुटांच्या उंचीवर असलेले शबरीमला हे दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक आहे. यापूर्वी 1969 मध्ये व्ही.व्ही. गिरि यांनी शबरीमला मंदिरात दर्शन घेतले होते. तेव्हा ते केरळचे राज्यपाल होते.
Comments are closed.