अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, महिलांची टोळी जेरबंद

लग्नाचे वय उलटूनही लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्यामुळे सर्वत्र मुलांबरोबरच त्यांची कुटुंबीयही चिंतेत आहेत. याचाच गैरफायदा घेऊन लग्नाचा बनाव रचून लुटमार करण्याचा नवा उद्योग भामट्यांनी सुरू केला. आतातर या भामट्यांनी अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या बहाण्याने गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. विवाहेच्छुकांच्या भावनांशीच हे भामटे खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार शिरूरमध्ये उघडकीस आला आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या माहेर संस्थेतील अनाथ मुलींचे आम्ही लग्न लावून देऊ, असे आमिष दाखवत खोटे प्रमाणपत्र देऊन पैसे उकळून फसवणूक करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पोलिसांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. सपना भाऊराव पोडे (वय 26, रा. विसापूर, ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर), प्रियंका नितेश जांगळे (वय 33, रा. पंचशील चौक, दुर्गापूर, जि. चंद्रपूर), भूमिका सुरेश सौंदरकर (वय 24, रा. सुमित्रानगर, तुकूम, जि. चंद्रपूर), प्रांजली सुभाष सुखदेवे (वय 20, रा. सालोरी, येन्सा ब्लॉक, पोस्ट चिनोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) व आचल आशीष बोरेवार (वय 25, रा. हनुमाननगर तुकूम, जि. चंद्रपूर) यांना अटक केली.

नारायण शिरोडकर हे त्यांच्या भाच्याला लग्नासाठी मुलगी देतो, असे सांगून एका महिलेने ऑनलाइन पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होता. फसवणूक करणाऱ्या महिला या चंद्रपूरमध्ये असून, त्या वढू बुद्रुक येथील माहेर संस्थेचे फोटो व काही माहिती देऊन नागरिकांना लग्नासाठी मुली देतो म्हणून फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख, पोलीस हवालदार महेंद्र पाटील, उद्धव भालेराव, महिला पोलीस शिपाई रुपाली निंभोरे, संध्या शिंदे यांनी चंद्रपूरमध्ये जाऊन संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. सर्व महिलांना शिरूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील हे करत आहेत.

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

शिक्रापूर पोलिसांनी माहेर संस्थेत लग्नाकरिता मुली असल्याची बतावणी करून बनावट बायोडाटा व फोटो पाठवून लग्नासाठी रजिस्ट्रेशन व कोर्ट मॅरेजसंदर्भाची कागदपत्रे बनविण्याच्या नावाखाली पैसे लुबाडणारी टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून आणखीही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Comments are closed.