कर्करोगाच्या औषधांच्या किंमतीतील कपात लागू होणार आहे

137 औषधांचे दर झाले कमी : रुग्णांना दिलासा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कर्करोगावरील 137 औषधांचे दर सोमवार, 9 नोव्हेंबरपासून स्वस्त झाले आहेत. औषध कंपन्यांनी 121 औषधांच्या 1,364 प्रकारांच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. यापैकी 679 ब्रँड्सच्या किमती 50 टक्क्यांपेक्षा जास्त कमी करण्यात आल्या असून सर्वाधिक कपात 96.45 टक्के आहे. या दरकपातीमुळे रुग्णांची वार्षिक अंदाजे 3,540.38 कोटींची बचत होण्याची अपेक्षा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 22 सप्टेंबर रोजी कर्करोगाच्या औषधांच्या थेट किरकोळ किंमती आणि कमाल किरकोळ किंमतीमधील नफ्याच्या फरकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 2,700 रुपयांचे औषध 27,000 रुपयांना विकणे म्हणजे दिवसाढवळ्या दरोडा आणि नरसंहार करण्यासारखे असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या नाराजीनंतर, 17 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) 137 नॉन-शेड्यूल्ड कर्करोग औषधांवरील कंपन्यांच्या नफ्याच्या फरकावर 30 टक्क्यांची मर्यादा घातली. या निर्णयानंतर औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत.

तज्ञ समितीची शिफारस

किमती कमी करण्याची शिफारस आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या (डीजीएचएस) अंतर्गत असलेल्या एका तज्ञ समितीने केली होती. या समितीत देशभरातील आघाडीचे कर्करोगतज्ञ, वैद्यकीय तज्ञ, रुग्णालय विशेषज्ञ आणि सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता. समितीने 137 औषधांसाठी नफ्याचा फरक तर्कसंगत करण्याची शिफारस केली. ही यादी वेळोवेळी अद्ययावत करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Comments are closed.