पहिल्या हंगामात आवक वाढल्याने दर आवाक्यात; बंदीनंतर ताज्या स्वस्त कोळंबी, मांदेलीची बोहनी,पुढच्या आठवड्यात पापलेट, सुरमईचे ‘घबाड’

बंदीनंतर पहिल्या हंगामासाठी मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात सध्या बोंबील, कोळंबी व मांदेली बोहनी होत आहे. मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे या माशांचे दर आवाक्यात आले असून खवय्ये ताज्या फडफडीत बोंबील, मांदेलींवर ताव मारत आहेत. पुढील आठवड्यात मोठी मासळीदेखील बाजारात दाखल होईल. त्यात पापलेट, सुरमईचे घबाड सापडणार असल्याने खवय्यांना आपल्या जिभेचे चोचले पुरवता येणार आहेत.

1 जून ते 31 जुलै दरम्यान खोल समुद्रात मासेमारीसाठी यांत्रिकी नौकांना बंदी करण्यात आली होती. 1 ऑगस्टपासून मासेमारीवरील बंदी संपली असून पावसानेही विश्रांती घेतली आहे. त्यामुळे काही मासेमारांनी समुद्रात मासेमारीला सुरुवात केली आहे. सध्या बोंबील, कोळंबी, मांदेली जातीची मासळी मोठ्या प्रमाणात मासेमारांना मिळत असल्याची माहिती प्रदीप नाखवा व मारुती खंडाळकर यांनी दिली, तर आवक वाढल्याने मासळीचे दर कमी झाले असून दोनशे रुपये वाटा मिळणारे बोंबील 100 रुपये, कोळंबी 100 ते 200 रुपये वाटा तर मांदेली 50 ते 100 रुपयांना विकत असल्याची माहिती प्रिती कोळी या मासळी विक्रेती महिलेने दिली. दरम्यान, मोठी मासळी अजूनही बाजारात फारशी येत नसल्याने खवय्ये याच मासळीला पसंती देत असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिऱ्याच्या किनारा परिसरातच मासेमारी करणाऱ्या छोट्या बोटींनी लावलेल्या जाळ्यात मांदेली, कोळंबी, बोंबील असे म्हावरे गावत आहेत. लाल जाळी खास कोळंबीसाठी लावली जाते. या जाळीतून अख्खी कोळंबी सोडवून काढणे ही एक कला आहे.

Comments are closed.