पंतप्रधान राष्ट्रपतींची बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. ही बैठक राष्ट्रपती भवनात झाली. तथापि, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्यात ही भेट का झाली हे स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून भेटीचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली असे ट्विट करण्यात आले आहे.
सध्या भारताच्या पुढील उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने 1 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, चालू आठवड्यात 7 ऑगस्ट रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी होणार असून उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.
यापूर्वी, 16 जुलै रोजी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ही भेट झाली होती. त्यानंतर आता विरोधकांच्या गदारोळामुळे संसद ठप्प असताना पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. याशिवाय, 7 मे रोजी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल माहिती दिली होती.
Comments are closed.